मुंबई - वडील भाजी विक्रेते, गेल्या वर्षापासून कोरोनाचे संकट. त्यामुळे घरची परिस्थिती बेताची. अशातच रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावलेल्या रोशन जवाद अहमद शेखने जिद्दीच्या जोरावर दिव्यांग असतानाही मुंबईतील केईएम रुग्णालयात जीएस मेडिकलमधून एमडी डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार केले आहे. यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
परिस्थिती बेताची, तरीही स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा -
जोगेश्वरीच्या चाळीत भाड्याच्या घरात राहणाऱ्या डॉ. रोशन जवाद अहमद शेख हिचे प्राथमिक शिक्षण फारुख हायस्कूलमध्ये झाले. तिने पहिलीपासून ते दहावीपर्यंत वर्गात प्रथम क्रमांक पटकावला. दहावीला तिने ९२.१५ टक्के गुण मिळवत जोगेश्वरीमध्ये सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला. बारावीला असताना, जोगेश्वरी येथे तिचा रेल्वे अपघात झाला. यामध्ये तिला आपले दोन्ही पाय गमावावे लागले. या काळात वडील देखील आजारी पडले. आईने तिची संपूर्ण जबाबदारी खांद्यावर घेत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. बारावीत तिने ७५ टक्के गुण मिळवून स्वतःला सिध्द केले. तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते आणि ते पूर्ण करण्याची जिद्द तिच्या मनात होती. प्रखर आत्मविश्वासाच्या जोरावर तिने उच्च शिक्षण पूर्ण केले. मात्र, तिला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.
हे ही वाचा -..आता कोथळा काढायची भाषा केली जाते; शरद पवारांनी नेत्यांची केली कानउघडणी
अन् अखेर एमबीबीएसला प्रवेश -
रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावल्याने रोशनला एमबीबीएसला प्रवेशापूर्वीच अपात्र ठरवण्यात आले. तिने याविरोधात २०११ मध्ये उच्च न्यायालयात याचिका करत दाद मागितली होती. उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्या. मोहित शहा आणि न्या. गिरीश गोडबोले यांच्या खंडपीठासमोर यावेळी सुनावणी झाली. दरम्यान, अपंगत्व चाचणी घेण्याचे न्यायालयाने मेडिकल बोर्डाला आदेश दिले. तरीही मेडिकल बोर्डाने तिला अपात्र ठरवले. मुख्य न्यायमूर्तींनी न्यायालयात तिची अपंगत्व चाचणी घेऊन मेडिकल बोर्डाला चांगलेच फटकारले. तसेच एमबीबीएसला तिला प्रवेश देण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाला दिले. केईएम रुग्णालयातील जीएस मेडिकलमध्ये रोशनला प्रवेश मिळाला. जिद्दीच्या जोरावर तिने पॅथॉलॉजी विभागातून एमडीचे शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. पुढील दोन वर्षे बॉण्ड सर्व्हिस पूर्ण करायची आहे. त्यानंतर यशस्वी डॉक्टर होऊन लोकांची सेवा करायची, अशी रोशनची इच्छा आहे. समाजातील गरीब-गरजू आणि अपंग लोकांच्या न्याय हक्कासाठी लढण्याचा तिचा निर्धार आहे.
हे ही वाचा -'ज्यांना पतंग उडवायची, त्यांनी उडवावी'! अखेर संजय राऊतांनी चर्चेला दिला पूर्णविराम
लोकं सतत टोचून बोलायची -
काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी तिच्या एमबीबीएस ते एमडीपर्यंतच्या शिक्षणाचा सर्व भार उचलला. भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी अपघातानंतर कृत्रिम पाय बसविण्यासाठी तिला मदत केली. तसेच मेडिकल अभ्यासक्रमाच्या कायद्यातील बदलासाठी तत्कालीन आरोग्य आयुक्तांना भेटून कायद्यात बदल करण्यात मोलाचा वाटा उचलल्याचे रोशन सांगते. दिव्यांग असल्याने लोक सतत टोचून बोलायचे. आई - वडील यामुळे दुःखी व्हायचे. माझी जिद्द कायम होती, त्यामुळेच हिंमत हरायची नाही असा मी मनाशी चंग बांधला होता. याचा फायदा एमडी डॉक्टर पदवी मिळविण्यासाठी झाल्याचे रोशनने सांगितले.