पुणे - कोरोनाच्या संकटामुळे मागील तीन महिन्यापासून राज्यभरातील मंदिरे बंद आहेत. ही मंदिरे खुली करण्यात यावी, या मागणीसाठी ब्राम्हण महासंघाने पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीसमोर आंदोलन केले.
देशभरासह राज्यात टाळेबंदीचे चार टप्पे पूर्ण झाले आहेत. टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यानंतर राज्यात अनेक व्यवसाय सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. परंतु सर्वधर्मियांच्या धार्मिक स्थळाबाबत कुठलाही निर्णय झाला नाही. केंद्र सरकारने जारी केलेल्या सूचनांत आठ जूनपासून मंदिरे खुली करण्यास परवानगी दिली होती. परंतु, अंतिम निर्णय राज्य सरकारवर सोपविला होता. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने अद्याप धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली नाही.
यावर बोलताना ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे म्हणाले, की कोरोनामुळे देशातील संपूर्ण व्यवहार बंद असताना आम्ही काही बोललो नाही. पण आता देश अनलॉक होण्यास सुरुवात झाली आह. नियम व अटी पाळून राज्यातील 80 टक्क्यांहून अधिक व्यवहार सुरळीत झाले आहेत. मंदिरावर फक्त पुरोहित वर्ग अवलंबून नाही. तर फुलवाले, हार विक्रेते, प्रसाद विक्रेते अशा सर्वांचे आर्थिक उत्पन्न थांबलेले आहे. अशावेळी सरकारने अधिक कठोर नियम घालून द्यावेत. मंदिरातील संख्येची मर्यादा घालून द्यावी. सकाळ व संध्याकाळ दोन दोन तास तरी मंदिरे उघडण्यास परवानगी द्यावी, या मागणीसाठी आंदोलन केले.
राज्यात दीडशे ठिकाणी अशाप्रकारे आंदोलने केल्याचा दावाही आनंद दवे यांनी केला आहे. तसेच सरकार आमच्या मागण्यांचा सकारात्मकरित्या विचार करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, कोरोनाच्या संसर्ग होण्याच्या भीतीने राज्यात धार्मिक स्थळे, शाळा अशा ठिकाणी परवानगी देण्यात आलेली नाही. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या देशात सर्वाधिक आहे.