ठाणे - एका चायनीज विक्रेत्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांच्या हप्तेखोरीला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. ही घटना उल्हासनगरमधील चोपडा न्यायालय परिसरात घडली आहे. सतीश खेडकर असे आत्महत्या केलेल्या चायनीज विक्रेत्याचे नाव आहे.
हप्ता मागत असलेल्या पोलिसांचा त्रास असह्य झाल्याने सतिशने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच जोपर्यंत दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असे म्हणत नातेवाईकांनी जमावासह पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला आहे. या आत्महत्येने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृत सतिशला मध्यवर्ती पोलीस ठाण्यातील काही पोलीस हप्ता मागून सतत त्रास देत होते. त्यांच्या त्रासाला कंटाळून त्याने गळफास घेवून आपले जीवन संपवल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तरुण मुलाच्या अकाली मृत्यूचा धक्का बसलेल्या कुटुंबीयांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. हाप्त्यासाठी पोलिसांनी एवढा त्रास दिल्याची ही घटना पोलीस खात्यावरच प्रश्न चिन्ह उभे करत आहे. अशा प्रकारामुळे पोलीस विभाग बदनाम होत आहे. त्यामुळे आता या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात याकडे उल्हासनगर शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.