ठाणे - वाढदिवसा दिनीच २१ वर्षीय युवकाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना काल्हेर येथील राजलक्ष्मी कॉम्प्लेक्स समोर घडली. पियुष विजय मिश्रा (२१ रा. मानव कॉम्प्लेक्स ,काल्हेर ) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. मित्रांसोबत वाढदिवस साजरा करून येताना अॅक्टिव्हा खड्ड्यावरुन घसरल्याने हा अपघात झाला. या अपघात प्रकरणी नरपोली पोलीस ठाण्यात १६ नोव्हेंबर रोजी मृत पियुष याच्या विरोधातच गुन्हा दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मृत पियुष २५ ऑगस्ट रोजी २१ वा वाढदिवस असल्याने तो साजरा करण्यासाठी मित्रांना सोबत घेऊन ठाण्यातील मानपाडा रोडवरील लॉंज - १८ या कॅफेमध्ये गेला होता. रात्री उशिरापर्यंत वाढदिवसाची पार्टी उरकल्यानंतर त्याने मित्राचीच दुचाकी घेऊन तो घरी येण्यासाठी निघाला होता. त्यावेळी पहाटे ३.१५ वाजण्याच्या सुमारास तो काल्हेर गावच्या हद्दीतील राजलक्ष्मी कॉम्प्लेक्ससमोर असताना त्याची दुचाकी खड्यात आदळून खाली पडली. यावेळी त्याच्या डोक्याला ,हनुवटीला व हाताला जबरी मार लागल्याने त्याला आजुबजूच्या नागरिकांनी बेशुद्धावस्थेत एस.एस.हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. मात्र गंभीर मार लागल्याने त्याच्या कान व नाका तोंडातून अति रक्तस्त्राव झाल्याने त्याचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला.
या अपघात प्रकरणी नरपोली पोलीस ठाण्यात १६ नोव्हेंबर रोजी मृत पियुष याच्या विरोधातच गुन्हा दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पराग भाट करीत आहे. मात्र, या घटनेमुळे भिवंडीकर नागरिक संतप्त झाले असून, खड्डे न बुजविणारे अधिकारी व ठेकेदाराला सोडून पोलिसांनी मृत तरुणांविरोधातच अडीच महिन्यांनंतर स्वतःच्या मरणास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे.
दरम्यान, राज्य शासनाने भिवंडीतील अंजूरफाटा - कशेळी हा रस्ता खाजगी टोल कंपनीकडे बीओटी तत्वावर चालवण्यासाठी दिला होता. मात्र, टोल कंपनी रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावर रोजची वाहतूक कोंडी व वारंवार होणारे अपघात यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या नादुरुस्त रस्त्याच्याविरोधात नागरिकांनी तक्रारी केल्याने राज्य शासनाने हा रस्ता खाजगी कंपनीकडून काढून घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्त्याची दुरुस्ती व देखभाल करण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सदरचा रस्ता तात्काळ दुरुस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी भाजपच्या जिल्ह्याचे उपाध्यक्ष छत्रपती पाटील यांनी केली आहे.