ठाणे - कानात हेडफोन लावून रेल्वे रुळालगत चालणाऱ्या एका तरुणीचा लोकलच्या धकडेत जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण रेल्वे स्थानकानजीक असलेल्या सांगळेवाडी परिसरात असलेल्या रेल्वे रुळानजीक घडली आहे. अंतूदेवी दुबे (28), असे रेल्वे अपघातात जागीच ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
हेही वाचा - खड्डे नसतानाही नवी मुंबईत खड्डे बुजविण्याचे काम सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, मृत अंतूदेवी ही लोकउद्यान गृह संकुलामधील एका इमारतीमध्ये कुटंबासह राहत होती. ती साकेत महाविद्यालयात शिकत होती. ती नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमाराला कॉलेजला जाण्यासाठी कल्याण पश्चिमेकडील सांगळेवाडी मार्गाने कल्याण रेल्वे स्थानकात जात होती. त्यावेळी कानात हेडफोन लावून ती रेल्वे रुळाजवळून चालत होती. त्याच सुमाराला पाठीमागून येणाऱ्या लोकलने तिला जोरदार धडक दिली. या लोकलच्या धडकेत तिचा जागीच मृत्यू झाला, असे घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी सांगितले.
हेही वाचा - उल्हासनगरमध्ये घरात घुसून 39 वर्षीय महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न
अपघाताची माहिती मिळताच कल्याण लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करत तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवला.
दरम्यान, रेल्वेच्या निष्काळजीपणामुळे अंतूदेवीचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे 10 ते 15 वर्षापूर्वीचा वहिवाटिचा पर्यायी रस्ता रेल्वे प्रशासनाने बंद केला आहे. मात्र, रेल्वे रुळालगत असलेल्या संरक्षण भिंतीचे काम अर्धवट स्थितीत असल्याने या परिसरातील नागरिक कल्याण रेल्वे स्थानकात जाण्यासाठी सांगळेवाडी येथून रेल्वे रूळ ओलांडत असतात. तर गेल्या 8 दिवसात याच ठिकाणी दुसरा अपघात झाला असून 2 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती समोर आली आहे.