ठाणे Suicide : 'माझी चुकी नव्हती मी या जातीत जन्माला आलो' असं सुसाईड नोटमध्ये लिहून आंतरजातीय प्रेमविवाह करणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाने राहत्या घरात आत्महत्या केलीय. ही घटना बदलापूर पूर्व परिसरात घडली आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात आत्महत्या केल्याप्रकरणी अनुसूचीत जाती जमाती प्रतिबंध कायद्यानुसार पत्नीसह सासरच्या 7 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पत्नी, अंकिता यश गायकवाड, सासरा नागप्पा पुजारी, सासू शकुंतला, मेव्हणी प्रियंकासह तिचा नवरा तसंच आर्वेश पुजारी, सागर अशी गुन्हा दाखल झालेल्या 7 आरोपींची नावं आहेत. यश संजय गायकवाड असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे.
राहत्या घरात आत्महत्या : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अंजली गायकवाड ह्या मृत तरुणाच्या आई आहेत. त्या मृत मुलासह बदलापूर पूर्व परिसरात असलेल्या सुखकर्ता इमारतीत 15 वर्षापसून राहतात. तर मृतक यश हा मुंबई एअरपोर्ट येथे नोकरीला होता. त्यातच गेल्या 7 ते 8 महिन्यापूर्वी कुर्ला भागात राहणाऱ्या अंकिता या तरुणीशी ओळख होऊन दोघात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मात्र या प्रेमाला अंकिताच्या घराचा विरोध होता. त्यामुळं अंकिताच्या घरच्यांनी जातीवाचक शिवीगाळ केली होती. मात्र, तरीही अंकीता त्याला आईवडिलांच्या चोरून भेटत होती. त्यानंतर तिनंच त्याला लग्नासाठी होकार देत, लग्न करण्याची तयारी दर्शवल्यानं दोघांनी नाशिक येथे जाऊन जून 2023 मध्ये लग्न केलं होतं.
मुलाला जातीवाचक शिविगाळ : आपल्या मुलीनं खालच्या जातीच्या तरुणाशी विवाह केल्याचा राग मुलीच्या कुंटुंबाचा होता. मुलीच्या कुंटुंबांनी मुलाला सासरी बोलवून जातीवाचक शिविगाळ केली होती. त्यातच काही दिवसांनी पत्नी अंकिता हिनंही आई वडिलांची साथ देत, पती मानसिक छळ सुरू केल्याचं पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केलं आहे. काही दिवसांपूर्वीच तरुण पत्नीला भेटण्यासाठी गेला असता, त्याला सासरच्या मंडळीकडून अपमानास्पद वागणूक देण्यात आली. त्यानंतर त्यानं नैराश्यातून 28 ऑक्टोंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र आत्महत्या करण्यापूर्वी त्यानं 4 पानाची सुसाईट नोट लिहून ठेवली.
7 जणांवर गुन्हा : या घटनेनंतर 29 ऑक्टोंबर रोजी मृतकाच्या आईच्या तक्रारीवरून बदलापूर पोलीस ठाण्यात पत्नीसह 7 जणांवर भादंवि कलम 306, 34,सह अनुसूचीत जाती जमाती प्रतिबंध कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा दखल करण्यात आला. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्याशी संपर्क साधला असता, मृतकच्या आईच्या तक्रारीवरून 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगितलं. या प्रकरणात 2 नोंव्हेबर रोजी आरोपी पत्नी, तिच्या विडिलांना अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच इतर पाच आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. यापैकी एक अल्पवीयन असल्याचंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा -