ठाणे - एकीकडे वाढदिवसानिमित्त ओली पार्टी आणि त्यात पत्त्यांचा रंगलेला डाव सुरू असताना दुसरीकडे एका तरुणाने कुतूहल म्हणून बनावट पिस्तूल समजून हाताळताना चाप दाबला, आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना शहापूर तालुक्याच्या आटगाव येथील आग्रीपाड्यातील अतुल्य शुभवास्तू, या इमारतीत घडली आहे. सिध्देश प्रकाश जंगम (वय 28)असे या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी बेकायदेशीररीत्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्या तेथील रहिवाशावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मृत सिध्देश याचे वडील प्रकाश जंगम यांचा आणि त्यांच्या शेजारी राहणारे अरमान नाचरे यांची पत्नी आलीया हिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आरोपी भरत शेरे यांच्या घरात ओली पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये सर्व बिअर पिऊन पत्ते खेळत होती. काही वेळानंतर आरोपी भरत शेरे हा त्याच्या बेडरुममध्ये गेला. तर मृताचे वडील प्रकाश यांची रात्रपाळी असल्याने तेही दुपारच्या सुमारास घरी गेले. त्यांनतर दुपारी 4.30 च्या सुमारास अरमान नाचरे व इब्राहीम हमीद नाचरे यांनी मृताच्या वडिलांना, सिध्देशने बघा काय केले असे म्हणत आरोपी भरत शेरे याच्या खोलीत नेले. यावेळी, सिध्देशच्या डोक्यातून व नाकातून रक्तस्त्राव येत असल्याचे त्यांना दिसले.
या घटनेची माहिती शहापूर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यावेळी, पोलिसांना मृत सिध्देश याच्याजवळ गावठी पिस्तूल (अग्नीशस्त्र) व मॅगझीन त्यात २ जिवंत काडतुसं मिळून आली. सिध्देशला उपचाराकरीता शहापूर उपजिल्हा रुग्णालय नेले असता, त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. दरम्यान, आरोपी भरत शेरे याने अनाधिकृतपणे अग्निशस्त्र (गावठी पिस्टल) स्वत:जवळ बाळगून त्याचा चुकून वापर झाल्यास संकट ओढावू शकते याची जाण असतानाही ते पिस्तूल सुरक्षितरित्या ठेवले नाही. हे पिस्तूल सिध्देशच्या दृष्टीस पडले आणि त्याने पिस्तूल बनावट असल्याचे समजून चाप दाबला. या घटनेमध्ये पिस्तूल मधील गोळी त्याच्या स्वतःच्या डोक्यात झाडली गेली आणि त्याचा अपघाती मृत्यू झाला.
या प्रकरणी रेल्वे विभागात फिटर म्हणून नोकरी करणारे सिध्देशचे वडील प्रकाश रामचंद्र जंगम (53) यांच्या फिर्यादीवरून शेजारी राहणाऱ्या भरत शेरे नामक इसमावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहापूर पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.