ठाणे - घरकाम करणाऱ्या 25 वर्षीय मोलकरणीवर घरमालकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना कल्याण पूर्वेतील एका उच्चभ्रू सोसायटीत घडली. रवींद्र सिरसाट (वय 45) असे आरोपी घरमालकाचे नाव आहे. याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात आरोपी घरमालकावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
हेही वाचा - माजी नौदल अधिकारी पतीला जिवंत जाळणारी पत्नी पोलिसांच्या ताब्यात
याबाबतची सविस्तर माहिती अशी, की पीडित मोलकरीण ही अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली असता, आरोपी घरमालकाने त्याठिकाणी कॅमेऱ्यामध्ये तिचे विवस्त्र अवस्थेत फोटो काढले. या फोटोच्या आधारे आरोपीने पीडितेला ब्लॅकमेल करून तिच्यावर वारंवार बळजबरीने अत्याचार केला. सतत होणाऱ्या अत्याचारामुळे पीडिता गरोदर राहिल्याने तिचा दोन वेळा गर्भपातही केल्याचे समोर आले आहे. पीडित मोलकरीण मुबंईत राहत असून तिला कामाची गरज असल्याने तिच्या परिचयातील नातेवाईकाला सांगून दोन वर्षांपूर्वी आरोपीच्या घरी घरकामाला आली होती.
हेही वाचा - अश्विनी बिद्रे खून प्रकरण : 'यामुळे' सरकारी वकील सोडणार खटला
आरोपीची पत्नी नोकरीनिमित्त सकाळपासून घराबाहेर असते तर दुपारी मुलेही शाळेत जातात. त्यामुळे घरात कोणी नसल्याची संधी साधत आरोपीने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. आरोपीने याप्रकाराची कुठेही वाच्यता केली तर तुझी वाट लावेल, अशी धमकी दिली. या धमकीने भयभीत झालेल्या पीडितेने घडलेल्या प्रकार कोणालाही सांगितला नाही. त्यामुळे आरोपी घरमालकाची हिंमत वाढतच गेली. त्यांनतर त्याने पीडितेशी घृणास्पद प्रकारे अनैसर्गिक संबध करून त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. पीडितेवर सतत होणाऱ्या अत्याचारामुळे ती दोनवेळा गरोदर राहिली होती. आरोपीने तिचा कल्याण पूर्वेतील खासगी रुग्णालयात गर्भपातही केला होता.
हेही वाचा - यवतमाळच्या दिग्रसमध्ये शीर नसलेला अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
आरोपी घरमालकाकडून वारंवार होणाऱ्या अत्याचारामुळे पीडिता भयभीत होवून काम सोडून मूळगावी राहण्यास गेली होती. या कालावधीत तिचे लग्नही जमले होते. ही बाब आरोपी घरमालकाला कळताच त्याने पीडितेच्या होणाऱ्या भावी पतीला निनावी पत्र पाठवून तिचे लग्न मोडण्यास सांगितले. त्यामुळे तिचे होणारे लग्नही मोडले. अखेर तिने धाडस करून आरोपी घरमालकाकडून झालेल्या अत्याचाराचा पाढाच कोळशेवाडी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्यांसमोर वाचला. तिच्यावर घडलेल्या प्रसंगाची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत आरोपी रवींद्र सिरसाट विरोधात भादंवि. कलम 376, 377, 500, 504, 506 अनव्ये गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच आरोपी घरमालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.