ठाणे - ठाण्यात इमारतीच्या ३२ व्या मजल्यावरून उडी मारून एका तरूणाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सायंकाळी घडली. प्रथमेश महेश परब (वय १७ रा.कळवा, मनीषानगर) असे मृत युवकाचे नाव आहे. तो आपल्या मित्राला भेटण्यासाठी आला होता. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप उघड झाले नसले तरी पोलिसांनी इमारतीच्या सीसीटीव्ही आणि त्याच्याकडील मोबाईलद्वारे तपास सुरु केला आहे.
कळव्यातील मनीषानगरमधील देवेंद्र सोसायटीत राहणारा प्रथमेश राबोडीतील सरस्वती शाळेत इयत्ता अकरावीत शिकत होता. कळव्यातील त्यांच्या शेजारील कुटुंब साकेत परिसरातील रुस्तुमजी अक्यूरा सोसायटीत राहावयास गेले असल्याने मंगळवारी सायंकाळी प्रथमेश त्यांच्या घरी जातो असे सांगून घरातून गेला होता. त्यांच्या घरून निघाल्यानंतर त्याच इमारतीतील वरच्या मजल्यावर दुसऱ्या मित्राला भेटण्यासाठी गेलेल्या प्रथमेशने इमारतीच्या ३२ व्या मजल्यावरील कठड्यावर मोबाईल ठेवून मोकळ्या जागेतून थेट खाली उडी घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, त्याच्या आत्महत्येचे कारण समोर आले नसल्याने पोलिसांनी इमारतीचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु केली आहे.