ठाणे - कल्याण पश्चिम परिसरात भरदिवसा एका बंद घराचे कुलूप तोडून एका चोरट्याने तब्बल २२ लाख ६५ हजारांच्या रोकडसह ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिक धास्तावले आहेत. विशेष म्हणजे तक्रारदार महिलेची मुलगी परदेशी शिक्षण घेत असून फी भरण्यासाठी महिलेने स्वतःचा दुकानाचा गाळा विकून मिळालेली रोकड घरात ठेवली होती. निशा भट्ट असे महिलेचे नाव असून त्यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात त्यांनी घरफोडीची तक्रार दाखल केली आहे.
कल्याण डोंबिवली शहरात घरफोडीच्या घटना वाढत असून चोरट्यांनी एकच उच्छाद मांडला आहे. रात्रीच्या सुमारास बंद घरे हेरून कुलूप तोडणारे चोरटे आता दिवसाढवळ्याही बंद घराचे कुलूप तोडून घरातील ऐवज लंपास करत असल्याचा घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना कल्याण पश्चिम रामबाग परिसरात भरदिवसा घडली आहे. एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड, अमेरिकन डॉलर्स असा मिळून तब्बल २२ लाख ६५ हजारांचा ऐवज लंपास केला आहे.
कल्याण पश्चिम रामबाग लेन नंबर ३ मधील मेघना सोसायटीमध्ये निशा भट्ट या कुटुंबासह राहतात. त्यांची मुलगी परदेशात शिक्षण घेत असून फी भरण्यासाठी त्यांनी दुकानाचा गाळा विकून मिळालेले पैसे घरात ठेवले होते. त्यांची मुलगी काही दिवसांकरता घरी आली होती. निशा आपल्या मुलीसह काल(शनिवार) सकाळी साडे दहाच्या सुमारास राहत्या घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. दरम्यान, अज्ञात चोरट्याने घर बंद असल्याची संधी साधत त्यांच्या घराच्या सेफ्टी डोअरसह दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाट उघडून कपटामधील सोन्या-चांदीचे दागिने, रोकड, अमेरिकन डॉलर्स, क्रेडिट कार्ड, कागदपत्रे असा एकूण २२ लाख ६५ हजरांचा ऐवज चोरून नेला.
हेही वाचा - नवी मुंबईत स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी चित्ररथ
दुपारी साडे तीनच्या सुमारास निशा घरी परतल्या असता त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. फी भरण्यासाठी घरात ठेवलेल्या रोकड आणि इतर ऐवज चोरीस गेल्याने त्यांना धक्का बसला. त्यांनी या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकरणाच्या तपासकामात ३ पथके तैनात करण्यात आली असून तपास सुरू असल्याचे सांगितले.
हेही वाचा - VIDEO : रस्त्यावर दुचाकी घसरल्यानंतर चालकाला ट्रकने चिरडले, थरार सीसीटीव्हीत कैद