ठाणे - गरज सरो अन् वैद्य मरो या म्हणीचा प्रत्यय ठाण्यातील ग्लोबल रुग्णालयातील परिचारकांना आला आहे. मागील दीड वर्षांपासून कोरोना थोपविण्यासाठी ठाणे महापालिकेने हजारो खाटांचे ग्लोबल रुग्णालय उभारले होते. त्या ठिकाणी काम करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, वार्डबॉय व इतर शेकडो जणांची भर्ती केली. मात्र, आता दुसरी लाट ओसरत असताना त्यांना एक मेसेज पाठवून कामावरुन कमी करण्यात येत असल्याचे आरोप करण्यात आले असून पुन्हा सेवेत सामिल करुन घ्यावे व कोरोनानंतरही शासकीय रुग्णालयात भर्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
आम्हाला न्याय मिळावा
कोरोना काळात आम्ही आमच्या व कुटुंबीयांच्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस कोरोनाग्रस्तांची सेवा करत होतो. मात्र, अचानक मेसेज करुन कामावरुन कमी करण्यात येत आहे, हे अन्यायकारक असून आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी येथील परिचारिकांनी केली आहे.
पालकमंत्र्यांनी दखल घ्यावी अन्यथा रुग्णालय बंद पाडू - प्रवीण दरेकर
या सर्वांवर अन्याय होऊ नयेत एवढीच आमची भूमिका असून पालकमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. गरज असताना जवळ केले पण, कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असताना या सर्व परिचारिकांना दूर करणे हा अन्याय असून पालकमंत्र्यांनी पालिका आयुक्त आणि महापौरांशी चर्चा करावी. या सर्वांना सेवेत समावून घ्यावे, अन्यथा हे रुग्णालय बंद पाडू, असा इशारा दरेकर यांनी दिला आहे.
हेही वाचा - ..आणि डॉक्टरांनी मुलीच्या पोटातून काढला ६५० ग्रॅम वजनाचा केसांचा गोळा, वाचा संपूर्ण प्रकरण