ठाणे - एका कामगाराने मध्यरात्रीच्या वेळी सोसायटीच्या आवारात प्रवेश केल्याने नागरिकांनी पकडून त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार भिवंडीतील अजंटा कंपाऊंड परिसरात घडला आहे.
याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून सोसायटीच्या तिघा रहिवाशांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. भरतभाई शंकरदास पटेल (वय 50), संदीप रमणलाल शाह (वय 38), आणि जतीन देवानंद हरिया (वय 38) असे खुनाच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत, तर जोखाईप्रसाद रामचरित्र मोर्या (वय 28) असे मारहाणीत मृत झालेल्या कामगाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत मोर्या हा भिवंडीतील आलम सेठ यांच्याकडे सोफा सेटच्या कापडाच्या डिलिव्हरीचे काम करीत होता. 11 जून रोजी त्याने रात्रीच्या सुमारास तो राहत असलेल्या शेजारच्या इमारतीमध्ये प्रवेश केला. तो मध्यरात्रीच्या सुमारास सोसायटीच्या आवारात गेल्याने सोसायटीच्या रहिवाशांनी त्याच्यावर चोर असल्याचा संशय घेऊन त्याला लाथा-बुक्याने व लांकडी दांड्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याच्या डोक्यावर जोरदार उपटी लागल्याने तो काही क्षणातच बेशुद्ध पडला होता.
दरम्यान, या मारहाणीची माहिती भोईवाडा पोलिसांना मिळाल्याने त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्याला प्रथम उपचारासाठी स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी त्याची बहिण संगीता हिने मुंबईतील केईएम रुग्णालयात हलवले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा दुदैवी मृत्यू झाला.
याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी माऊली सोसायटीमधील भरतभाई पटेल, संदीप शाह, जतीन हरिया या तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे, या तिघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अधिक तपास एपीआय टी. जी.जोशी करीत आहेत.