ठाणे - काळजाचा थरकाप उडविणारी घटना ठाकुर्ली रेल्वे स्थानकात घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ही घटना पाहता ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय समोर आल्याचे दिसून येत आहे. कमल शिंदे असे काळजाचा थरकाप उडविणाऱ्या घटनेतून बचावलेल्या महिलेचे नाव आहे.
कमल शिंदे ही महिला डोंबिवलीतील खंबाळपाडा येथील भोईरवाडीत कुटुंबासह राहते. सोमवारी दुपारच्या सुमाराला प्लॅटफॉर्मवर ती एकटीच बसली होती. दरम्यान १ वाजून ४५ मिनिटांनी १ नंबर फलाटावर लोकल येताच प्लॅटफॉर्मवर बसलेल्या कमलने अचानक उठून रुळाकडे धाव घेऊन स्वत:ला लोकल समोर झोकून दिले आणि क्षणातच लोकलचे २ डबे तिला ओलांडून पुढे गेले. ही घटना पाहणाऱ्या फलाटावर उभे असलेल्या प्रवाशांचा त्यावेळी अंगाचा थरकाप उडाला आणि रेल्वे स्थानकात एकच गोंधळ उडाला.
दरम्यान, ठाकुर्ली रेल्वे स्थानकात तैनात असलेले जितेंद्र कुमार, रोहित कुमार या आरपीएफ जवानांनीही कमला रुळावर उतरताना पहिले होते. त्यानंतर लोकल थांबताच त्या दोन्ही जवानांनी वेगाने रुळाकडे धाव घेऊन कमलला गाडीखालून जिवंत बाहेर काढले.
कमल रुळाच्या मध्यभागी २ स्लीपर्समध्ये पडल्याने ती बचावली गेली. कमल ही मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती आरपीएफ सूत्रांनी दिली. आत्महत्या करण्यासाठीच तिने लोकलसमोर उडी मारल्याचे सांगितले जात आहे. मात्र, तिने कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला आहे.