ठाणे - डोंबिवलीत २२ वर्षीय तरुणीचा लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे. चार्मी पसाद (वय 22) असे मृत तरुणीचे नाव आहे. डोंबिवली ते कोपर स्थानकादरम्यान आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
चार्मी ही डोंबिवलीतील देसले पाडा परिसरात राहत होती. ती मुबंईतील एका खासगी कंपनीत नोकरीला होती. नोकरीला जाण्यासाठी चार्मीने आज(16 डिसेंबर) सकाळी ८.५३ ची लोकल पकडली होती. मात्र, प्रचंड गर्दीमुळे आत न जाता आल्याने चार्मी बाहेर लटकून राहिली आणि कोपर स्थानकाजवळ तोल जाऊन पडली. घटनेची माहिती मिळताच डोंबिवली लोहमार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. तिला उपचारासाठी पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
यापूर्वीही डोंबिवलीतील भावेश नकाते, धनश्री गोडवे, रजनीश सिंग आणि विपेंद्र यादव, हे प्रवासी मुंबई लोकलच्या गर्दीचे बळी ठरले आहेत. 2013 पासून कल्याण रेल्वे पोलिसांच्या हद्दीत 3 हजार निष्पाप नागरिकांना रेल्वे दुर्घटनांमध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 5 वर्षात याच रेल्वे पोलिसांच्या हद्दीत सातत्याने सर्वाधिक मृत्यू होत असताना उपाययोजनांच्या बाबतीत मात्र निराशा आहे.
हाही वाचा - जागेसाठी झालेल्या वादात प्रवाशाला चालत्या लोकलमधून फेकले बाहेर; हार्बर मार्गावरील प्रकार
रेल्वे प्रवास सुरक्षित करण्यासाठी स्वयंचलित दरवाजे मदत करू शकतात. परंतू लोकलमध्ये असणारी गर्दी बघता तसे दरवाजे बसवणे शक्य नाही. तंत्रज्ञानाचा आधार घेत यावर काही तोडगा काढला जावा, अशी मागणी प्रवासी करत आहेत. कुर्ला ते कल्याणदरम्यान पाचवा व सहावा मार्ग टाकण्याचे काम गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहे. हा मार्ग वाढला की लोकलच्या फेऱ्या वाढणार आहेत. त्यामुळे अपघातांच्या संख्येत घट होण्याचीदेखील अपेक्षा आहे. दिवा ते कल्याण दरम्यानचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. ते पुढील वर्षी डिसेंबर महिन्यात पूर्ण होईल, असे मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे म्हणणे आहे. ही मुदत यापूर्वी मार्च महिन्यापर्यंत होती मात्र, ती अचानक वाढवण्यात आली आहे.