ठाणे - दोन महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांना आपल्या घरात ठेवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या एका वयोवृद्ध महिला दलालासह ग्राहकाला पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी 2 महिलांची दलालांच्या तावडीतून सुटका केली आहे. ही घटना उल्हासनगर कॅम्प नंबर चार येथील कुर्ला कॅम्प परिसरात घडली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
हेही वाचा - रेल्वेमध्ये प्रवाशांच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या चोरट्याला बेड्या, १५ लाखांचे दागिने जप्त
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरातील कुर्ला कॅम्प परिसरात 62 वर्षीय वयोवृद्ध महिला आपल्या राहत्या घरातच कुंटणखाना चालवत होती. या महिला दलालाने दोन महिलांना बळजबरीने घरात ठेवून त्यांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी विठ्ठलवाडी पोलिसांच्या मदतीने सदर घरावर धाड टाकली. यावेळी घरात दोन पीडित महिला देहविक्री करत असल्याचे आढळून आले. या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची रवानगी महिला सुधारगृहात केली. तसेच त्या महिला दलालासह बनवारीलाल या ग्राहकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मोबाईल, रोख रक्कम असा 17 हजार 790 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी हवालदार राजेश मोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात महिला दलालासह बनवारीलाल या ग्राहकाला ताब्यात घेऊन अटक केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) एन. जी. खडकीकर करत आहेत.