ठाणे : ठाण्याच्या संस्कृतीचा भाग असलेला ठाणे स्थानक परिसरातला स्वेटर मार्केट यावर्षी पुन्हा एकदा सुरू झाला आहे. मात्र या मार्केटमध्ये नॉर्थ ईस्ट मधल्या व्यापाऱ्यांची ( North East sweater sellers ) कमतरता भासत आहे. मागील अनेक दशक नॉर्थ ईस्ट वरून येणारे व्यापारी ठाण्यात आपला व्यवसाय करत होते. यंदा मात्र ते पाहायला मिळत नाहीत. मागच्या दोन वर्षाच्या कोविडच्या काळात पूर्णतः व्यवसाय ठप्प झाल्यामुळे आता या व्यवसायामध्ये फार कमी प्रमाणात लोक राहिले असल्याचे स्थानिक व्यापारी सांगत आहेत.
म्हणून नॉर्थ ईस्टच्या व्यापाऱ्यांचे प्रमाण कमी - कोरोनाचा दोन वर्षांचा काळ ठप्प झालेला व्यवसाय, कच्च्या मालाचा वाढलेल्या किमती आणि ग्राहकांची कमतरता अशा एकूणच सर्व अडचणीच्या बाबी लक्षात घेऊन आता स्वेटर विक्रीसाठी नेपाळ व नॉर्थ ईस्ट वरून येणारे व्यापारी ठाण्यात दिसत नाहीत. वाढती महागाई राहण्याखाण्याचा खर्च वाहतूक खर्च आणि त्यातून मिळणारा मोबदला लक्षात घेता आता हा व्यवसाय करणे परवडत नसल्यामुळे हा व्यवसाय डबघाईला आला आहे. त्यामुळे लुधियाना, पंजाब व दिल्ली या ठिकाणी तयार झालेले स्वेटर बाजारात पाहायला मिळत आहेत आणि याच स्वेटरांच्या विक्रीतून अनेक व्यापारी आपला उदरनिर्वाह करत आहेत.

हिवाळ्याची सुरूवात मात्र ग्राहक नाही - थंडीपासून बचावासाठी स्वेटर, कान टोपी, मफलर किंवा शाल या गोष्टी दरवर्षी ग्राहक खरेदी करत नाही आणि चांगल्या क्वालिटीचा माल हा अनेक वर्ष टिकतो. त्यामुळे तीन महिन्यांचा व्यवसाय असलेला हा स्वेटर व्यवसाय मोठ्या गुंतवणुकीचे तर ठरतोय, मात्र त्यातून उत्पन्न कमी प्रमाणात मिळते आणि म्हणूनच आता या व्यवसायात जास्त लोक येत नाहीत. त्यामुळे थंडी सुरू झाली आहे, मात्र ग्राहक काही मिळेनासे झाल्याचे व्यापारी सांगतात.

ब्रँडेड कंपन्यांचे उत्पादन बाजारात - दिवसेंदिवस कमी होणारा व्यवसाय आणि त्यातच मोठमोठे ब्रँडेड स्वेटर ऑनलाईन किंवा शोरूम मधून घेत असल्यामुळे ग्राहकांचा कल आता अशा ब्रॅण्डेड वस्तू घेण्याकडे जास्त आहे आणि त्यामुळेच वर्षभर स्वेटर बनवून थंडीच्या काळात विक्री करणारे नॉर्थ ईस्टचे व्यापारी लोक आता पाहायला मिळत नाहीत.