ठाणे- राज्य शासनाने सोमवारपासून मद्यविक्रीला परवानगी दिली आहे. मात्र, ठाणे जिल्ह्यातील मद्यविक्री सोमवारी बंदच होती. आज जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या दुकानांना परवानगी देण्यात आली. त्यानंतर पोलिसांच्या देखरेखीत याठीकाणी मद्यविक्री सुरू झाली असून तळीरामांनी शिस्तीत दारू खरेदीसाठी रांग लावली आहे.
हेही वाचा- मुंबईतील नेपियन सी रोड परिसरातील इमारतीच्या सहाव्या मजल्यावर भीषण आग
सरकारच्या नियमावली प्रमाणे वाईन शॉप समोर सहा फूटांवर वर्तुळ आखण्यात आले आहेत. त्या वर्तुळामध्ये तळीरामांनी भर उन्हाच्या पारात एकामागे एक अशी रांग लावली. तर खरेदीसाठी आलेल्या प्रत्येकाची थर्मल स्कॅनिंग करुनच त्यांना दारू दिली जात आहे.
ठाणे जिल्ह्यातील काही भागात मद्य विक्री केली जाणार नसल्याचा निर्यण पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करुन घेतला. यामध्ये कोरोनाचे हॉटस्पॅाट ठरलेल्या ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या ठिकाणी मद्य विक्री होणार नाही. त्यामुळे लॉकडाऊनचा काळ संपेपर्यत या परिसरात राहणाऱ्या तळीरामांचा घसा कोरडाच राहणार आहे.
मात्र, मंगळवार पासून ठाणे ग्रामीण भागात काही ठिकाणी मद्य विक्रीला परवानगी दिली. त्यामध्ये भिवंडी ग्रामीणमधील कल्याण-भिवंडी मार्गावरील वाईन शॉपचा समावेश आहे. याठिकाणी वाईन शॉप पोलिसांच्या देखरेखीत आज पासून सुरू झाल्याचे पाहून शेकडो तळीरामांनी दारूसाठी गर्दी केली.