ठाणे - एका इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये नौदलातून निवृत्त झालेल्या ५० वर्षीय अधिकाऱ्याचा मृतदेह १०० टक्के जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना ५ जानेवारीला समोर आली होती. त्यांच्या पत्नीने त्यांना जिवंत जाळल्याचे समोर आले असून आरोपी पत्नीला अटक करण्यात आली आहे. तसेच तिच्याविरोधात बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुड्डूसिंग यादव, असे मृत माजी नौदल अधिकाऱ्याचे नाव आहे, तर सुनीता यादव (३८) असे आरोपी पत्नीचे नाव आहे. खळबळजनक बाब म्हणजे बदलापुरातील हायप्रोफाईल साईआर्केड या इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर ५ जानेवारीला पती झोपेत असताना त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला जिवंत जाळून ठार मारले. त्यानंतर घटनेच्या दिवसापासून आरोपी पत्नी घरातून निघून गेली होती. त्यामुळे ही आत्महत्या आहे की हत्या? याबाबत गूढ कायम होते. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. त्यामध्ये गुड्डूसिंग यादव यांची हत्या पत्नी सुनीताने केल्याचे समोर आल्याने बदलापूर पोलिसांनी तिला पुण्यातील ससून रुग्णालयातून ताब्यात घेतले. आरोपी सुनीताही पतीला जिवंत जळताना १५ टक्के भाजली आहे. यामुळे पोलिसांनी तिला मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
बदलापूर पश्चिम भागातील खामकर विद्यालयाजवळ असलेल्या साई आर्केड या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर मृत गुड्डूसिंग यादव यांनी २००९ मध्ये हा फ्लॅट विकत घेतला होता. मृत यादव हे नौदलातून निवृत्त झाले असून ते दिल्ली येथे आयकर विभागात कार्यरत होते, तर आरोपी पत्नी सुनीता ही त्यांच्या दोन मुलासंह अलाहाबाद येथे राहत होती. मृत यादव यांना बदलापूरमधील फ्लॅट विकण्यासाठी २ जानेवारीला ते आपल्या पत्नीसह बदलापूरला आले होते. मात्र, ५ जानेवारीला पती पत्नीमध्ये काही कारणावरून भांडण झाले होते. त्याच दिवशी पहाटे मृत गुड्डूसिंग यांच्या घरातून धूर येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती बदलापूर पश्चिम पोलीस व अग्निशमन विभागाला दिली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारिपुत्र आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी गुड्डूसिंग यांच्या घरात मोठया प्रमाणात लागलेल्या आगीत त्यांचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह पोलिसांना मिळून आला होता. चौकशीत गुड्डूसिंग याच्यासोबत त्याची पत्नी सुनीता ही देखील राहण्यासाठी आली होती. पण घटना घडल्यापासून ती त्या ठिकाणाहून पसार झाल्यामुळे पोलिसांना तिच्यावरच अधिक संशय येत होता. त्यामुळे त्यांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.
सर्वप्रथम बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात या घटनेप्रकरणी अकस्मत मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली होती. तब्बल एक आठवडा पोलीस मृत गुड्डूसिंग यांची पत्नी सुनीताचा शोध घेत होते. त्यावेळी पुण्यातील बंड गार्डन पोलिसांनी संबंधित महिला पुण्यातील ससूण रुग्णालयात दाखल असल्याची माहिती दिली. तसेच तिने पतीसोबत भांडण झाल्यामुळे ते रात्री झोपेत असताना त्यांना जिवंत जाळले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने बेवारस स्थितीत घरात टाकून पळून गेली. मात्र, यावेळी तिचा पाय देखील १५ टक्के भाजला होता. त्यामुळे ती बदलापूर येथून थेट पुण्याला गेली आणि ससूण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली. पुण्यातील बंड गार्डन पोलिसांनी तिच्याकडे केलेल्या चौकशीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी सुनीता हिचा जबाब नोंदवून बदलापूर पश्चिम पोलिसांना दिल्याने या प्रकरणी गुड्डूसिंग यादव यांच्या खुनाप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात सुनीता यादव हिच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गुड्डूसिंग यादव यांना नेमके कोणत्या कारणावरून पत्नीने जाळून ठार मारले? याचे खरे कारण तिच्या उपचारानंतर समोर येणार असल्याची माहिती उघडकीस येणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक दोंदे यांनी सांगितले.