ठाणे - पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना उल्हासनगरमधील मुकुंद नगर परिसरात घडली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात एका मुलीने वडिलांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करताच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. दिपक पगारे, असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दिपक आणि त्याची पत्नी व मुलगी प्रतिक्षा उल्हासनगरमधील मुकुंद नगर परिसरात राहत होते. दिपक हा त्याच्या पत्नीसोबत लहान-सहान वाद घालून सतत भांडण करत असे. खळबळजनक बाब म्हणजे आरोपी दीपक हा गेल्या काही दिवसांपासून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता याच वादातून शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. त्या रात्री वाद एवढ्या विकोपाला गेला की, दीपकने घरातच ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून खून केला. हा सर्व प्रकार पाहून दिपकची मुलगी प्रतीक्षा ही आईला वाचवण्यासाठी गेली. मात्र, तिलाही दिपकने जोरदार धक्का दिल्याने ती जमिनीवर पडून बेशुद्ध झाली.
उल्हासनगर पोलीस ठाण्यात आपल्या वडिलांनी आईची हत्या केल्याची प्रतिक्षाने माहिती दिली. यावरून पोलिसांनी आरोपी दिपकला अटक केली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) आर. सावंत करत आहेत.