ठाणे Wife Commits Suicide : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश नायर असं अटक आरोपी पतीचं नाव आहे. तो कल्याण (पूर्व) येथील काटेमानिवली परिसरात राहणारा आहे. (Wife Suicide Case Thane) मृतक पीडितेचे वडिलांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलं की, आरोपी नितीशवर त्यांच्या मुलीचं प्रेम होतं. त्यामुळे दोघांचा २०२० मध्ये प्रेमविवाह केला होता. दोन वर्ष सुखानं संसार सुरू असतानाच, सप्टेंबर महिन्यात पत्नीला तिचा पती नितीशचे युक्रेनमधील एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आला होता. शिवाय तिच्या पतीचे त्या महिलेसोबतचे काही फोटोही मोबाईलमध्ये दिसल्यानं संशय अधिकच बळावला. त्यातच कुटुंबीयांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं आहे की, पतीच्या अनैतिक संबंधाबाबत कळल्यानंतर तिने त्याच्या नात्याला विरोध केला होता आणि भविष्यात युक्रेनला न जाण्याचा इशारा दिला होता.
पती युक्रेनला पोहोचला अन् पत्नीला केला मेसेज : ८ नोव्हेंबरला नितीशने आपल्या पत्नीला सांगितलं की, तो काही कामासाठी बीकेसी येथील त्याच्या कार्यालयात जात आहे. पण त्याऐवजी तो युक्रेनला गेला आणि तिथून त्याने पत्नीला मेसेज केला की, मी युक्रेनला पोहोचलो असून मी परत येणार नाही. तसंच तू मला विसरून जा, दुसरा मार्ग निवड, असा मॅसेज आरोपी पतीनं पत्नीला पाठवला. यामुळे पत्नी नैराश्यात गेली होती. त्यानंतर तिच्यावर खूप मानसिक आघात झाला आणि १० नोव्हेंबरला दिवाळीच्या दिवशी तिनं राहत्या घरी आत्महत्या केली.
तिनं आत्महत्येची कल्पना मित्रांना दिली : या प्रकरणाचा तपास करणाऱ्या कोळसेवाडी पोलिसांनी याबाबत माहिती दिली. आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या काही मित्रांना मेसेज करून आत्महत्या करणार असल्याची माहिती दिल्याचं पोलीस तपासात समोर आलं. शिवाय मृत पत्नीनं तिच्या आईला पतीकडून होणाऱ्या आघाताची माहिती दिली होती. पीडितेनं आपलं जीवन संपवल्यानंतर, गुरुवारी तिचा पती नितीश मायदेशी परतला आणि परत आल्याची माहिती मिळताच त्याला त्याच्या राहत्या घरातून अटक केली गेली. दुसरीकडे आरोपी पती नितीशला अटक केल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा: