ठाणे - कपिल पाटील फाऊंडेशन व हिंदू सेवा संघ (महाराष्ट्र) यांच्या संयुक्त प्रयत्नांतून आज १ हजार १०१ आदिवासी जोडप्यांचा सामुहिक विवाह सोहळा संपन्न होणार आहे. शहापूर तालुक्यातील आसनगावातील शिवाजीराव जोंधळे मैदानावर दुपारी १२ वाजता सोहळा पार पडेल. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित राहणार आहेत. भाजपचे भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांच्या पुढाकाराने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
आदिवासी बांधवांमध्ये शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे घरची परिस्थिती हालाकीची असली, तरीही लग्न सोहळ्यावर कर्ज काढून खर्च करण्याची हौस आदिवासी समाजातील अनेकांसाठी पुढील आयुष्यात अडचणीची ठरली आहे. आयुष्यातील उमेदीची वर्षे लग्नासाठी घेतलेले कर्ज फेडण्यात निघून जातात. त्यामुळे आर्थिक आघाडीवर अडचणींचा सामना करावा लागतो. परिणामी अपेक्षित प्रगती साधता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन खासदार कपिल पाटील फाऊंडेशनच्या माध्यमातून या अनोख्या आणि समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आज दुपारी १२ वाजता आदिवासी जोडप्यांच्या सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातून कपिल पाटील यांनी एक आगळावेगळा आदर्श घालून दिला आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून यापुर्वीही असे उपक्रम राबवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.