ठाणे- राज्य शासनाने २००६ पासून शहापूर तालुक्यात मंजूर केलेल्या १९३ नळपाणी पुरवठा योजनांपैकी आजही २७ नळपाणी पुरवठा योजना रखडल्या आहेत. ३ योजनांमध्ये अपहार झाल्याने त्यांच्या अध्यक्षांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर ४ योजना रद्द केल्याची माहिती उघड झाली आहे.
१९३ पैकी ९२ योजनांची कामे अंतिम असून ४९ योजना भौतिक दृष्ट्या पूर्ण तर १४ योजनांमध्ये पाणीपुरवठा सुरू आहे. ४ नळ पाणी योजतील विहिरी कोरड्या आहेत. अशा एकूण १९३ नळपाणी पुरवठा योजनांपैकी १५५ योजना सुरू असून ३३ योजना मार्च अखेर सुरू नव्हत्या. सरकारी अनस्थेमुळेच दरवर्षी धरणांच्या तालुक्याला पाणी टंचाईचा सामोरे जावे लागत असल्याचे दिसून आले आहे.
राष्ट्रीय पेयजल योजनेतील आदिवासी क्षेत्र, वर्धित वेग, महाजल कार्यक्रम, बिगर आदिवासी क्षेत्रात या नळ आणि पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या. शहापूर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागातील पाच शाखा अभियंत्यांमार्फत या योजनांचा कारभार व देखरेख सुरू आहे. या योजनांच्या ट्रेंच गॅलरी, जकवेल विहीर, पंप हाउस, वितरण व्यवस्था, वीज जोडणी, उंच टाकीचे कामे व्यवस्थित झालेले नाही. त्यामुळे योजना असूनही अनेक गावात नळाने पाणी पुरवठा होत नसल्याचे चित्र समोर आले आहे.
शासनाच्या २९ टँकरने तालुक्यातील २०० हुन अधिक गाव पाड्यात पाणीपुरवठा केला जात आहे. शहापूर तालुक्यात कोट्यवधीचा निधी पाणीपुरवठा योजनेवर खर्च करूनही अपूर्ण पाणी योजना, योजनेचा अपहार व बोगस कामांमुळे अनेक गावात योजना मिळूनही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ गावकऱयांवर आली आहे.
शहापूर तालुक्यात अनेक लहान मोठी धरणे असूनही धरण उशाला आणि कोरड घशाला, अशी अवस्था होऊन बसली आहे. नळ पाणीपुरवठा योजनां बाबत जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. जेणेकरून आगामी काळात शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई समस्या उदभवणार नसल्याचे मत गावकरी व्यक्त करीत आहेत.