ठाणे : कोरोना काळात घरातच असल्याने लहानपणीच श्रेयाला गाण्याची आवड निर्माण झाली. घरात कोणाचीच संगीताची पार्श्वभूमी नसतांना देखील तिने शास्त्रीय संगीत शिक्षणाचे धडे गिरवायला सुरुवात केली. आणि यासाठीच्या पहिल्या परीक्षेत विशेष गुण संपादित करत ती उत्तीर्ण झाली. तिच्या आवाजाची जादू अल्पावधीतच सर्वत्र पसरली. कोरोना काळात ऑनलाईन सुरु असलेल्या अनेक स्पर्धांमध्ये तिने यशाची मोहोर उमटवली.
श्रेया जन्मापासूनच दृष्टीहीन : लायन्स क्लब चर्चगेट द्वारे आयोजित स्पर्धेत विजेतेपद, 'व्हॉइस ऑफ ठाणेकर्स-२०२३'चे उपविजेतेपद, ठाणे आयडॉल २०२३ चे उपविजेतेपद, ठाणे महापौर चषकसाठी विशेष लक्ष्णीय पारितोषिक अशी अनेक पारितोषिक तिच्या शिदोरीत जमा देखील झाली. अनेक पारितोषिकांवर श्रेयाने आपले नाव सुवर्ण अक्षरांनी अगदी सहजपने कोरले. संगीतात विशेष प्राविण्य मिळवलेली श्रेया जन्मापासूनच दृष्टीहीन आहे. मात्र परिस्थितीवर मात करत तिने कोणतीही तक्रार न करता परिस्तितीशी जुळवून घेत संगीताची कला उत्तम जोपासली आहे.
अनेक कार्यक्रमांत श्रेयाला विशेष आमंत्रण : श्रेयाला शास्त्रीय संगीतासाठी ठाण्यातील शोभा केळकर या गुरु लाभल्या. आपल्या गुरूच्या मार्गदर्शनाखाली श्रेयाने शास्त्रीय संगीताचा रियाज नित्यनियमाने सुरु ठेवला. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या दुसऱ्या परीक्षेची तयारी देखील केली आहे. दहा वर्षांची श्रेया ब्राह्मण शिक्षण मंडळ इंग्लिश मीडियमच्या शाळेत इयत्ता चौथीत शिकत आहे. आई स्वाती आणि वडील राहुल यांच्या मोलाच्या साथीने श्रेयाने आजवर अनेक महत्वाचे टप्पे गाठले. छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये तसेच अनेक कार्यक्रमांत श्रेयाला विशेष आमंत्रण देण्यात येते. सोनी टीव्हीवरील 'बडे अच्छे लगते हे' या मालिकेच्या संगीत समारंभात तर श्रेयाने इंडियन आयडलचे विजेते पवनदीप आणि अरुनिता यांच्यासोबत गाण सादर केले आहे.
गायिका बनण्याचे स्वप्न : श्रेया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांसोबत 'दिवांग स्नेही उद्यान ठाणे' च्या उद्घाटन समारंभाचा भाग होती. तसेच श्रेयाला नेते धनंजय मुंडे आणि बच्चू कडू यांच्यासह मंत्रालयात भारताच्या राज्यघटनेच्या ब्रेल लिपीतील उद्घाटनासाठी देखील आमंत्रित करण्यात आले होते. श्रेयाची आवडती गायिका लता मंगेशकर या आहेत. श्रेया लता दीदींची सर्व गाणी आवडीने गाते, त्याच सुरात म्हणते. श्रेयाला पुढे मोठे गायिका आणि संगीतकार बनायचे आहे. प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांना भेटण्याची ईच्छा आहे. माझ्या संगीत शिक्षणापाठी माझ्या आईचा मोठा वाटा आहे, आईकडून शिकण्यास मला चांगली मदत मिळते. कुठल्याही लाईव्ह कार्यक्रमात किंवा स्पर्धांमध्ये संगीत रसिकांकडून मिळणारी दाद आणि कौतुकाने खुप छान वाटते, अशी भावना श्रेया व्यक्त करते.
श्रेयाची लढाई जन्मापासून : श्रेयाचा जन्म तिची आई स्वाती शिंपी साडे पाच महिन्यांची गरोदर असतांनाच झाला. ज्यावेळी तिचा जन्म झाला, तेव्हा तीच वजन अवघे 600 ग्रॅम इतके होते. त्यामुळे तिचा जीव वाचवणे तिच्या आई वडिलांसमोर मोठ आव्हानात्मक होते. श्रेयाच्या जन्मानंतर श्रेयाला तीन महिने रुग्णालयातच उपचारासाठी ठेवण्यात आले होते. उपचाराने श्रेयाचा जीव तर वाचवता आला, मात्र दरम्यान उपचाराचा भार श्रेयाच्या दोन्ही डोळ्यांवर पडला. श्रेयाला आपली दृष्टी गमवावी लागली. श्रेयाला दृष्टी मिळावी. यासाठी तिच्या आई वडिलांनी जिवाच्या आकांताने खुप प्रयत्न केले, मात्र ते असफल ठरले. श्रेयाला आपण वाचवू शकलो. एवढा आनंद श्रेयाच्या आई वडिलांना मिळत असतांना दुसरे संकट त्यांच्यावर कोसळले. ते म्हणजे बोलण्याच्या वयात श्रेया बोलु शकत नव्हती, मात्र त्यांनी हिंमत हारली नाही, तिला बोलता यावे, यासाठी प्रयत्न सुरु केले. श्रेया बोलु लागली. आता श्रेयाला छान गातांना पाहून तीचे कौतुक होतांना पाहून दोघांचाही उर भरून येतो.