ठाणे - खासदार राजन विचारे यांनी शुभम मंगल कार्यालय येथे शनिवारी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. लसीकरणासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी लसीकरणासाठी ओळखीच्या लोकांना आतमध्ये सोडणाऱ्या एका शिवसैनिकावर खासदार विचारे हे चांगलेच संतापले होते. दरम्यान, या गेटवरील शिवसैनिकाला विचारे यांनी फटका लागावला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
ओळखीच्या माणसांना आतमध्ये सोडल्याचा नागरिकांनी केला होता आरोप -
ठाण्यात खासदार राजन विचारे यांच्यातर्फे शुभम मंगल कार्यालय येथे लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लसीकरणाचे फक्त तीनशे डोसच होते. मात्र ठाण्यात गेले दोन दिवस लसीकरण बंद असल्यामुळे या ठिकाणी लसीकरणासाठी स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्यासाठी नागरिकांनी सकाळी सहा वाजल्यापासून रांगा लावल्या होत्या. त्यामुळे गर्दी लक्षात घेता फक्त दोनशे जणांचे लसीकरण करण्याचे ठरवण्यात आले होते. गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलीस प्रशासन आणि शिवसैनिक प्रयत्न करत होते. त्याचवेळी गेटमधून ओळखीच्या लोकांना आत सोडले जाते, असे तेथील नागरिकांनी आरोप केला. त्यामुळे विचारे यांना राग आला. त्याचवेळी गेटवर असणाऱ्या शिवसैनिकाला राजन विचारे यांनी फटका मारला आणि ओळखीच्या माणसांना कशाला आत सोडतो? अशी विचारणा केली. ओळखीच्या माणसांना आतमध्ये न सोडण्याचे बजावले. अगदी थोड्या वेळातच राजन विचारे यांनी शिवसैनिकाला फटका मारलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
या आधी राजन विचारे यांनी चपाती खिलवली होती -
काही वर्षांपूर्वी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनमध्ये जेवणाच्या दर्जावरून चिडलेल्या खासदार राजन विचारे यांनी तेथील कर्मचाऱ्याला रमजानचा उपवास असताना चपाती खायला घातली होती. तेव्हा वाद निर्माण झाला होता. राजन विचारे हे नगरसेवक, महापौर, खासदार, आमदार असा प्रवास केलेले आहेत. मात्र ते त्यांच्या रागामुळे ओळखले जातात आजच्या या प्रकारामुळे पुन्हा एकदा राजन विचारे यांचा रागिट स्वभावाचा प्रत्यय शिवसैनिकांनाही पाहायला मिळाला.
हेही वाचा - ठाणे रेल्वे स्थानकात शिवसेना खासदार आणि रेल्वे पोलिसांमध्ये जुंपली