ठाणे - कुख्यात गुंड विकास दुबे एनकाऊंटर नंतर त्याच्या सहकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मला विमानाने घेवून जावे, जर उत्तर प्रदेश पोलिसांनी मला रस्त्याने नेले तर ते माझा एनकाऊंटर करतील, अशी भीती विकास दुबेचा उजवा हात मानला जाणारा अरविंद त्रिवेदीने काल न्यायालयात व्यक्त केली. त्याची विनंती न्यायालयाने मान्य केली असून, तसे आदेश न्यायालयाने दिले आहेत. महाराष्ट्र एटीएसने ठाण्यातून विकास दुबेचा उजवा हात मानला जाणार गुंड अरविंद त्रिवेदीला सोमवारी अटक केली होती.
त्रिवेदील अटक केल्यानंतर सोमवारी त्याला उत्तर प्रदेश पोलिसांच्य ताब्यात देण्यात आले. त्रिवेदीला ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. उत्तर प्रदेश पोलिसांनी विकास दुबेचा उजवा हात मानला जाणारा अरविंद त्रिवेदी हा भाजीच्या गाडीत बसून ठाण्यात आला होता. धक्कादायक म्हणजे विकास आणि अरविंद दोघे एकत्रित उज्जैनला पळाले होते. मात्र, त्यानंतर अरविंदने आपला वेगळा मार्ग निवडत मिळेल त्या गाडीने प्रवास करत ठाणे गाठले.
त्रिवेदीचा उज्जैन ते ठाणे प्रवास -
उज्जैन ते राजस्थान, राजस्थानहून पुण्याला, पुण्याहून नाशिकला आणि शेवटी भाजीच्या ट्रकमधून त्रिवेदी ठाण्याला आपल्या नातेवाईकांकडे आला होता. ठाण्याच्या कोलशेत येथे जाधववाडीत त्रिवेदीचे नातेवाईक राहत होते. त्यांच्याकडे तो आला होता. मात्र, तो इथे येताच काही तासात त्याची माहिती एनकाऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना मिळाली. त्यांनी सापळा रचून त्रिवेदीला त्याचा ड्रायव्हर सोनू तिवारीसह अटक केली. ठाण्याहून देखील त्रिवेदी पळण्याच्या तयारीत होता. मात्र, त्याआधीच त्याला अटक केली.
सोमवारी अरविंद त्रिवेदी आणि सोनू तिवारी यांना ठाणे न्यालयात हजर केले. न्यायालयाच्या आदेशानुसार उत्तर प्रदेश पोलीस या दोघांना मुंबई-कानपूर हवाई मार्गे विमानाने घेवून जाणार आहेत.