नवी मुंबई - महाविकास आघाडी सरकार हे भांबावलेले सरकार आहे. प्रत्येक निर्णयात सरकारची संभ्रमावस्था दिसून येत आहे. आयुक्तांच्या बदल्यांमध्येही तीन पक्षांमध्ये सरकार वाटमारी करत असल्याचा गंभीर आरोप विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
प्रवीण दरेकर हे आज नवी मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी दरेकर यांनी नवी मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केल्या जाणाऱ्या आरोग्य व्यवस्था आणि प्रशासकीय उपाययोजना संबंधित परिस्थितीचा आढावा घेतला. आयुक्त यांच्या बदली संदर्भात व इतर बाबींवर महाआघाडी सरकारवर सडकून टीका केली. विरोधी पक्षनेते दरेकर यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची भेट घेतली. यावेळी तेथील कोरोनाच्या परिस्थितीबाबत चर्चा करून उपलब्ध आरोग्य उपाययोजनांचा आढावाही घेतला.
यावेळी शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्याव्यात की रद्द कराव्यात, याबद्दल दोन मतप्रवाह असून तज्ज्ञांच मत लक्षात घेऊन यावर योग्य निर्णय घेण्याची गरज असून सरकार केवळ लोकप्रियतेच्या भावनेतून अंतिम परीक्षांचा निर्णय घेत असल्याचा थेट आरोप विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केला. अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. यावर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारला टोला लगावला.
अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने मुख्यमंत्र्यांनी पत्र व्यवहार केला आहे, जर हा निर्णय घेणे राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असते तर न विचारताच 15 दिवसांपूर्वीच राज्य सरकारने निर्णय घेतला असता, असा टोमणा दरेकर यांनी सरकारला मारला. महाविकास आघाडी सरकार हे भांबावलेले सरकार असून, प्रत्येक निर्णयात सरकारची संभ्रमावस्था दिसून येत आहे. आयुक्तांच्या बदल्यांमध्ये 3 पक्षांमध्ये सरकार वाटमारी करत असल्याचा दरेकरांनी गंभीर आरोप केला. आयुक्तांच्या वाटपात महाराष्ट्राचे वाटोळे होत आहे, असेही ते म्हणाले.