ठाणे- कोरोनाचा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्र येत्या 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण राज्यात कलम 144 अर्थात जमावबंदी लागू करण्यात आली. मात्र, त्यानंतरही लोकांनी गंभीरता लक्षात घेतलेली दिसत नाही. सोमवारी सकाळपासून मुंबई-ठाणे शहरात जाण्यासाठी वाहनचालकांनी महामार्गावर तोबा गर्दी केली आहे.
हेही वाचा- CORONA VIRUS : राज्यात संचारबंदी.. आता जिल्ह्यांच्या सीमाही बंद - मुख्यमंत्री
कायद्याचे पालन न करता बेजबाबदार नागरिक कोरोनाचे संकट ओढवून घेत असल्याने अखेर पोलिसांनी या वाहनचालकांना मुंबई, ठाण्यात नो एन्ट्री केली आहे. रविवारच्या जनता कर्फ्युनंतर सोमवारी पुन्हा मुंबईच्या दिशेने असंख्य वाहने निघाली होती. त्यामुळे मुंबईच्या प्रवेशद्वारावर मुलुंड टोल नाक्यावर वाहनांची प्रचंड रांग लागली होती. त्यामुळे ही गर्दी टाळण्यासाठी अखेर मुंबई-नाशिक महामार्गावरील मानकोली नाका येथे नारपोली पोलिसांकडून रस्ता अडवून वाहनांना रोखून माघारी पाठविण्यात आले.
भिवंडी-ठाणे बायपास रस्ता हा मुंबई नाशिक महामार्गावरुन मुंबईच्या दिशेने जाणार मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावरही वाहनांची गर्दी वाढू लागली होती. पोलिसांनी वाहनांना रोखून ठेवले होते. अत्यावश्यक पेट्रोल, डिझेल, दूध, भाजीपाला, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, अधिकारी यांना शहरात प्रवेश दिला जात होता. त्यामुळे बहुतांश वाहनचालक आपण मुंबई येथील घरी जात असून येथे कोठे थांबून राहणार म्हणून पोलिसांशी हुज्जत घालत होते.