ठाणे - हाथरस येथे वाल्मिकी समाजाच्या मुलीवर अमानुष अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. त्या निषेधार्थ ठाणे शहरात वंचित बहुजन आघाडी आणि वाल्मिकी विकास संघ यांच्या वतीने वागळे आगार डेपो ते इंदिरा नगर नाका दरम्यान कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी योगी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच इंदिरा नगर नाका येथे उपस्थित जनसमुदायाने हिला आदरांजली अर्पण करून योगी सरकारच्या बरखास्तीची मागणी केली.
उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सामूहिक अत्याचार प्रकरणातील 19 वर्षीय पीडितेचा दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. देशभरात या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. पीडितेला न्याय देण्याच्या मागणीसाठी देशभर आंदोलन केली जात आहेत. त्याच अनुषंगाने ठाणे शहरात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा समन्वयक राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली. 'योगी-मोदी मुर्दाबाद'च्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. वागले टीएमटी आगार येथून शिस्तबद्ध पद्धतीने वाल्मिकी समाजाचे नागरिक हातामध्ये मेणबत्ती घेऊन या मार्चमध्ये सहभागी झाले होते.
योगींच्या राज्यात दिवसाढवळ्या एका मुलीवर अत्याचार होतो आणि रात्रीच्या अंधारात पुरावे नष्ट केले जातात, अशा मुख्यमंत्र्याला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. तेथील जिल्हाधिकारी पीडित मुलीच्या कुटंबाला धमकावत आहेत. त्यामुळे त्यांना सहआरोपी करावे, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
हेही वाचा - मित्राच्या वाढदिवसाला जाणाऱ्या कॉलेज युवकावर काळाचा घाला
हेही वाचा - ठाण्यात एका विचित्र अपघातात १ जण जागीच ठार तर, एक गंभीर जखमी