ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागात सोमवारी दुपारपासून अतिजलद गतीने वारे वाहत होते. तर, सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, रात्रीच्या सुमारास काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरू झाला आहे. या अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने ग्रामीण भागात शेतीपूरक असलेल्या वीटभट्टी व्यवसायिकांचेही मोठे नुकसान होऊन त्यांनाही आर्थिक फटका बसला आहे. मात्र, शासनाने आजतगायत वीटभट्टी व्यवसायिकांना नुकसानभरपाई दिली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

कच्च्या मातीच्या विटा अवकाळी पावसाने विरघळल्या : विटभट्टीत भाजण्याच्या तयारीत असलेल्या तसेच, तयार करून ठेवलेल्या कच्च्या मातीच्या विटा अवकाळी पावसाने विरघळल्याने वीटभट्टी मालक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. शेती व्यवसायाला पूरक व्यवसाय म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या शेतात वीटभट्टीचा व्यवसाय करतात. ग्रामीण भागात भिवंडी तालुका, मुरबाड तालुका, शहापूर तालुका, कल्याण अंबरनाथ तालुक्यताही मोठ्या प्रमणात गावा गावांमध्ये शेतकरी मातीच्या विटांचा वीटभट्टी व्यवसाय करतात.

पुन्हा एकदा आर्थिक संकट : आधी सिमेंट विटा तसेच सिफॉरेक्स विटांनी मातीच्या विटांचा व्यवसाय डबघाईला आला असून, त्यानंतर कोरोना संकटामुळे वीटभट्टी व्यावसायिक आर्थिक संकटात असतानाच आता होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे वीटभट्टी मालकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे वीटभट्टी मालकांवर पुन्हा एकदा आर्थिक संकट ओढवले आहे.

वीटभट्टी मालकांनी नुकसान भरपाईची मागणी : ग्रामीण भागातील अनेक वीटभट्टी व्यावसायिक सावकाराकडून व्याजी पैसे घेऊन तसेच दागिने गहाण ठेऊन वीटभट्टी व्यवसायाची सुरुवात करतात. मात्र, अवकाळी पावसाने वीटभट्टी व्यावसायिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. व्यावसायिक आर्थिक संकटात सापडला असल्याने, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे शासनाने करावे व वीटभट्टी व्यावसायिकांना भरपाई म्हणून आर्थिक मदत करावी अशी मागणी वीटभट्टी व्यावसायिकांकडून केली जात आहे. मात्र, अशा प्रकारे अनेकदा अवकाळी पाऊस कोसळला आहे. परंतु, आजतागायत शासनाने वीटभट्टी मालकांनी नुकसान भरपाईची मागणी करूनही वीटभट्टी व्यवसायिकांना नुकसान भरपाईबाबत लाल कंदीलच दाखवल्याचे समजते.

तहसीलदारांना पंचनामे करणार : याबाबत उपविभागीय अधिकारी, अमित सानप यांच्याशी संपर्क साधला असता, वीटभट्टी व्यवसायिकांच्या नुकसान भरपाई बाबत शासनाकडून आतापर्यंत कोणतीही देयके मिळाली नसून, शासनाने नुकसान भरपाईसाठी निर्देश पारित केल्यावर उपविभागीय कार्यालायकडून वीटभट्टी व्यवसायिकांच्या नुकसान भरपाईसाठी तहसीलदारांना पंचनामे करायला सांगून, नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

शासन वारंवार याकडे दुर्लक्ष करत आहे : कोकण विभागीय वीट उत्पादक व ट्रक चालक मालक संघटना उपाध्यक्ष, शंकर गोराडकर यांनी सांगितले की, अनेकवेळा अवकाळी पावसामुळे वीटभट्टी व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. परंतु, शासन वारंवार याकडे दुर्लक्ष करीत असून, शासनाकडून आजतागायत कोणत्याही प्रकारचा अर्थसहाय्य वीटभट्टी व्यवसायिकांना मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा : Rang Barse Color Festival : रंग बरसे कार्यक्रमाचा वंचित घटकातील मुलांनी लुटला आनंद