ठाणे - जोरदार विजेच्या कडकडाट अन् अवकाळी पावसासह चक्री वादळाने संध्याकाळच्या सुमारास मुरबाड तालुक्यात कहर केल्याने अनेक घरांचे नुकसान झाले. दोन दिवस ढगाळ वातावरण असल्याने जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. अखेर गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास पावसाने तालुक्यातही काही भागात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला होता.
मुरबाड तालुक्यात वैषखरे, मोहप, टोकावडे परिसरात घरांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले. तर दोन दिवसांपूर्वीही अवकाळी पावसाने मोरोशी येथेही अनेक घरांचं नुकसान झाले. शिवाय वादळी वाऱ्यासह सोमनाथ घरत यांचे मातोश्री निवासस्थान चक्री वादळाच्या तडाख्यात सापडले. तसेच त्यांच्या दोन चारचाकी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे मुरबाड तहसीलदार यांनी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाचा पंचनामा करून झालेली नुकसान भरपाई लवकरात लवकर करून द्यावी, अशी मागणी मुरबाड तालुक्यातील वैशाखरे गावातील ग्रामस्थ करणार असल्याचे सांगितले.
पाऊस पडताना विजादेखील चमकत होत्या. प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला. मात्र, अवकाळी पाऊस असल्याने पुन्हा उकाडा वाढू शकतो, अशी भीती आता नागरिक व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.