ठाणे - अंबरनाथ शहरातील शिवसेना शाखेसमोरच दोन भावावर अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधूंद गोळीबार केला. या गोळीबारात एकाचा मृत्यू ( Murder Near Shiv Sena Branch ) झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले असून तपास सुरु केला आहे. तुषार गुंजाळ असे गोळीबारात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर गणेश गुंजाळ असे दुसऱ्या भावाचे नाव आहे. गणेश गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. हल्ल्याच्या थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांनी त्या फुटेजच्या आधारे तपास सुरु केला आहे.
गणेश गुंजाळ असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून दोघे नात्याने भाऊ आहेत. हा हल्ला तिघांजणांकडून करण्यात आला. तुषार आणि गणेश गुंजाळ यांना कालही व्हिडीओ कॉल करुन धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आज थेट शिवाजीनगरमधील शिवसेना शाखेच्या समोरील रस्त्यातच आज दुपारी एका चारचाकी वाहनात आलेल्या तीन अनोखळी हल्लेखोरांनी एका भावावर गोळीबार केला. तर दुसऱ्यावर धारधार हत्याराने वार करण्यात आल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. त्यामुळे दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तुषारचा मृत्यू झाला.
जखमी आणि मृतक गुंजाळ बंधूंचे काही दिवसांपासून शिवाजीनगर परिसरातील काही जणांबरोबर व्यावसायिक वाद सुरु होते. यावरून गेल्या काही दिवसांपासून गुंजाळ बंधू आणि त्यांच्या विरोधकांमध्ये नेहमीच वाद होत होते. त्यांचे हे वाद अगदी शिवाजीनगर पोलीस ठाण्यापर्यंतही गेले होते. त्यावेळी पोलिसांनी गुंजाळ बंधू आणि त्यांच्या विरोधकांना पोलीस ठाण्यात बोलवून घेण्यात आले होते. त्यावेळीही पोलिसांसमोरच मारामारीही झाली होती. त्यामुळे हा वाद गेल्या काही दिवसांपासून धुमसत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला. तर हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबाराचे कारण अध्यापही समजू शकले नसून पोलीस त्याचा तपास करीत आहेत. मात्र या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा : Police Firing : जालन्यात दोन गटात राडा, पोलिसाचा हवेत गोळीबार; हाणामारीत तीन जण गंभीर जखमी