ठाणे - १३ वर्षाच्या अल्पवयीन पुतणीचे नात्यातील एका १८ वर्षीय युवकाशी प्रेमसंबध असल्याच्या संशयाने सख्या काकाने खिडकीच्या कडप्यावर तिचे डोके आपटून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना डोंबिवली पूर्वे क्रांतीनगर भागात घडली आहे. याप्रकरणी डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. मयुरेश सफलिंगा (वय-३०) असे खुनाच्या गुन्ह्यात अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
डोंबिवली पूर्वेकडील क्रांतीनगर परीसरात सफलिंगा कुटुंब राहतात. महेश सफलिंगा पत्नी, मृत १३ वर्षीय मुलगी, भाऊ मयुरेश (आरोपी) आणि मानलेला भाचा शंकर हे राहतात. काही दिवसापासून आरोपी मयुरेशला १८ वर्षीय शंकर आणि १३ वर्षीय पुतणीचे प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. त्यातच सकाळच्या सुमारास आरोपी मुयरेश दारू पियुन घरी आला असता, त्याला शंकर हा पुतणीच्या बाजूला का झोपला होता? असा सवाल मयुरेशने आपल्या भाऊ महेश याला विचारला. मात्र शंकर आणि मृत पुतणीने याबाबात आमचे तसे काही नसल्याचे सांगितले. तरीही आरोपी मयुरेशने तिला मारहाण केली.
उपचारादरम्यान मृत्यू
संतापलेल्या मयुरेशन आधी शंकरला दगड विटाने मारहाण केली. त्यानंतर पुतणीलाही त्याने मारहाण करायला सुरूवात केली असता आरोपी मयुरेशने तीचे डोके खिडकीच्या दगडी चौकट असलेल्या कडप्यावर आपटल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांनतर तिच्या नातेवाईकांनी महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.