ठाणे - उल्हासनगरात लॉकडाऊन काळात कोरोनाबाधित रुग्णाची संख्या कमी होण्या ऐवजी एका आठवड्यात १ हजार ७०० रुग्ण वाढल्याने महापालिका प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. रविवारी १२ जुलैला लॉकडाऊन संपणार होता. त्यातच जिल्ह्यातील सर्वच महापालिकांनी लॉकडाऊन वाढविल्याने अखेर पालिका आयुक्तांनी शनिवारी एक प्रसिद्ध पत्रक काढून लॉकडाऊन १२ ते २२ जुलैपर्यंत वाढविल्याचे जाहीर केले.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी लॉकडाऊन २२ जुलैपर्यंत वाढविला. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले असून व्यापारी संघटनेने लॉकडाऊनला पाठिंबा दिला. कोरोनाची संख्या ३ हजार ९१४ वर पोहोचली आहे. यामुळे महापालिका आरोग्य सेवेवर ताण वाढला आहे. कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी यापूर्वी २ ते १२ जुलै दरम्यान लॉक डाऊन जाहीर केला होता.
वाढवलेल्या लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूचे दुकान, भाजीपाला, दूध यांच्यासह मेडिकल नेहमी प्रमाणे विशिष्ट वेळेत सुरु राहणार आहे. दुकानदारांना ग्राहकांच्या घरपोच साहित्य द्यावे लागणार आहे. लॉकडाऊनचे नागरिकांसह इतरांनी तंतोतंत पालन केल्यास कोरोनावर विजय मिळवणार असल्याची प्रतिक्रिया महापौर लीलाबाई अशान यांनी दिली. विविध व्यापारी संघटनेने, नागरिकांचे हित साधून लॉकडाऊनचे समर्थन केले.
शनिवारी कोरोनाबाधित रुग्णांमध्ये आतापर्यतची विक्रमी वाढ होऊन २९५ रुग्ण आढळून आले. आतापर्यत रुग्नांची संख्या ३ हजार ९१४ वर पोहोचली आहे. तर १ हजार ६५९ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच २ हजार १९२ रुग्नांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यत ६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.