ठाणे - रस्त्यावर सिग्नलच्या अवती भोवती अनेक मुले छोटा मोठ्या वस्तू विकताना आपल्याला दिसतात. अशाच एका सिग्नलवर गजरे विकणाऱ्या दशरथ पवार या मुलाने बॅटरीवर चालणारी एक दुचाकी तयार केली आहे. सिग्नल शाळेच्या रोबेटिक लॅबमध्ये असलेल्या साधनांचा वापर करून त्याने हे दुचाकीचे मॉडेल तयार केले आहे.
सुरूवातीपासून यंत्र, इलेक्ट्रीकच्या कामात होता रस -
ठाण्यातील तीन हाथ नाका सिग्नलवर अनेक मुले आपली उपजीविका चालवत आहेत. या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ठाणे पालिकेने सिग्नल शाळेची स्थापना केली आहे. या सिग्नल शाळेत शिकणाऱ्या दशरथ पवार या विद्यार्थ्याने बॅटरीवर चालणारी एक दुचाकी तयार केली आहे. दशरथने याच सिग्नल शाळेतून दहावीची परिक्षा दिली. या परिक्षेत तो चांगल्या मार्कने उतीर्ण झाला. सुरूवातीपासून यंत्र, इलेक्ट्रीकच्या कामात रस असलेल्या दशरथने दहावीनंतर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगच्या डिप्लोमाला प्रवेश घेतला. परंतु कोरोनामुळे ऑनलाईन वर्ग सुरू झाले. त्यानंतर इंडस्ट्रीअल व्हिजीट सुरू झाल्या आणि दशरथला त्याचे कौशल्य दाखवायला मार्ग मोकळा झाला. रोजच्या अभ्यास व्यतिरिक्त त्यांने रूस्तमजी ग्लोबल करिअर इंस्टिटयूटमधील सिग्नल शाळेच्या रोबेटिक लॅबमध्ये असलेल्या साधनांचा वापर करत बॅटरीवर चालणारी दुचाकी तयार केली.
सिग्नल शाळेचा अभिनव प्रयोग -
ठाण्यात सिग्नलवर काम करणाऱ्या मुलांना शिक्षण मिळावे या उद्देशाने एका समाजसेवी संस्थेने सिग्नल शाळेची सुरवात केली. त्यानंतर पालिका प्रशासनाने मदतीने सिग्नलवर काम करत पोट भरणाऱ्या मुलांना शिक्षण मिळणे सुरु झाले. या सिग्नल शाळेचा जागतिक स्तरावर सन्मान करण्यात आला आहे.