ठाणे - भिवंडी शहर परिसरातून अल्पवयीन मुलांच्या अपहरणाच्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत. शुक्रवारीदेखील दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून एक १२ वर्षीय मुलगा व एक १६ वर्षीय मुलगी अशा दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे परिसरातील पालक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पहिल्या घटनेत कामतघर येथील भाग्यनगरमध्ये राहणारा व कृष्णा कान्हा चौधरी स्कूलमध्ये सहावीत शिकणारा दिवाकर तापस महातो (१२) हा शुक्रवारी सकाळी शाळेत गेला होता. मात्र, तो दोन दिवस उलटूनही घरी परतला नाही. कुटुंबीयांकडून त्याचा परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. मात्र, तो सापडला नाही. त्यामुळे त्याचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले असावे, अशी भीती निर्माण झाल्याने वडील तापस दुलाल महातो यांनी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात मुलाच्या अपहरणाची तक्रार दाखल केली. या अपहरणाच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील करीत आहे.
हेही वाचा - आसाराम बापूच्या आश्रमातील सेवेकरी महिलेवर बलात्कार, आरोपी गजाआड
तर दुसऱ्या घटनेत शिवमल्हार कंपाऊंड, राहनाळ येथे राहणारी आंचल महेंद्र पांडे (१६) ही घरातून बाहेर गेली होती. मात्र, ती रात्री उशिरापर्यंत घरी परतली नाही. त्यामुळे तिचा नातेवाईक, मित्र, मैत्रिणींकडे शोध घेण्यात आला. मात्र, ती सापडली नाही. त्यावरून तिला अज्ञात व्यक्तीने पळवून नेले असावे, अशी खात्री पटल्याने तिचे वडील महेंद्र लल्लनप्रसाद पांडे यांनी नारपोली पोलीस ठाण्यात आंचल हिच्या अपहरणाची तक्रार दाखल केली. या गुन्ह्याचा पुढील तपास एपीआय पाटील करीत आहे.
हेही वाचा - भिवंडीत दोन 'दारुवाल्या आंटींना' अटक; घरातील गावठी दारूसह हातभट्टी केली नष्ट