ठाणे - भिवंडी परिसरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा चिरडून मृत्यू झाला. याप्रकरणी शांतीनगर व कोनगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पहिल्या घटनेत भिवंडी - कल्याण रोडवरील अरिहंत सिटीजवळ भरधाव कंटेनर चालकाने करीजमा दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. कंटेनरचे पुढील व मागील चाक डोके व पोटावरुन गेल्याने संजय अर्जुन चौहान (२० रा. कामतघर, काटेकर नगर) हा तरुण जागीच ठार झाला आहे. याप्रकरणी कंटेनर चालक देविदास पुंडलिक शिरसाठ (वय २८ रा. चुंबळी, ता. पाटोदा, बीड) याच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याला पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पाखरे यांनी अटक केली आहे.
दुसऱ्या घटनेत मुंबई-नाशिक महामार्गावरील ओवळी खिंडीत नाशिक-ठाणे वाहिनीवर होंडा शाईन दुचाकीला भरधाव अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिली. वाहनाचे चाक डोक्यावरून जाऊन दुचाकी चालक मारुती (वय ३० रा. ओवळी) हा जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात कोनगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जीवन शेरखाने करीत आहेत.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करीत या दोघांचेही मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.