ठाणे : भिवंडीतील भोईवाडा पोलिसांनी अमिना कंपाऊंडच्या सुप्रीम हॉटेलजवळील एका इमारतीमधून दोन गुन्हेगार तरुणांना अटक केली आहे. या तरुणांकडून पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. जावेद असफनदियार खान (वय, ४४) आणि मोहम्मद सलामत मोशा शेख ( वय, ३३) अशी अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.
गुप्त माहितीची आधारे झाली कारवाई : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पोलीस निरीक्षक सुरेश घुगे पोलीस पथकासह भोईवाडा पोलीस ठाणे हद्दीत १७ मे रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास गस्त करीत असताना शहरातील धामणकर येथील अमिना कंपाऊंड भागात सुप्रीम हॉटेलजवळ दोघे देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतुसे घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती पोलीस पथकाला मिळाली होती. माहिती मिळताच उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश बांगर,पोलीस उपनिरीक्षक सुरेश घुगे, योगेश कवडे, पोलीस नामदार उमेश नागरे,पोलीस शिपाई कुंभार, घुगे,विजय ताटे या पोलीस पथकाने सुप्रीम हॉटेलजवळ सापळा रचला. नजराना बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावरील घर क्र.८ मध्ये राहणारे जावेद आणि मोहम्मद या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली. दोघांकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
गुन्हा दाखल : पोलीस हवालदार विजय शंकर कुभार यांच्या फिर्यादीवरून भोईवाडा पोलिसांनी दोघांविरुद्ध भारतीय शस्त्र कायदा कलम ३,२५ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१),१३५ नुसार अटक केली असून सदर गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेला गावठी बनावटीचा कट्टा व जिवंत काडतुसे कुठून आली ? आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत का ? याचा तपास केला जात आहे.
हनुमान टेकडीही केली होती कारवाई : पाच दिवसापूर्वीच ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी वेश्या वस्ती भिवंडीतील हनुमान टेकडी भागातील वेश्या वस्तीत चार गुन्हेगारांवर पोलिसांनी झडप घालून अटक केली होती. या गुन्हेगारांकडून पिस्तुल, गावठी कट्ट्यासह कार जप्त करण्यात आली आहे. आशिष विनोद बर्नवाल ( वय, २०), मोह. जुनैद मोह. नदीम कस्सार (वय, १८), अहमद अली हसन शा (वय २०), अतिरुपती अजयकुमार पाणिग्रही (वय २२) अशी अटक करण्यात आलेल्या गुन्हेगार चौकडीचे नावे आहेत.
वेश्यावस्तीत पोलिसांनी रचला सापळा : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटल चार गुन्हेगार नवी मुंबई परिसरातील दिघा गावात राहत होते. रविवारी १४ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास या चार गुन्हेगार वेश्या वस्तीत येणार असल्याची माहिती खबर पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी वेश्यावस्तीत सापळा रचून या चारही गुन्हेगारांना झडप घालून ताब्यात घेतले. गुन्हेगारांकडून एक गावठी कट्टा, एक पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केले.
हेही वाचा