ठाणे - भिवंडीतील अण्णाभाऊ साठेनगर परिसरात बहिणीच्या प्रेमसंबंधाला विरोध करत 2 भावांनी तिच्या प्रियकराची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. तसा आरोप मृताच्या आईने पोलीस ठाण्यात केला आहे. मात्र, नारपोली पोलिसांनी दोन भावांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे नारपोली पोलीस वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. आप्पा किशोर पाटील (वय 21) असे मृत्त प्रियकराचे नाव आहे.
चंदन उपेंद्र प्रसादगौड (वय 25) आणि कुंदन उपेंद्र प्रसादगौड (वय 25) असे गुन्हा दाखल झालेल्या भावांची नावे आहेत. त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
खळबळजनक बाब म्हणजे प्रियकराच्या घरात घुसून या दोघांनी त्याला बहिणीबरोबरचे प्रेमसंबंध तोड, नाही तर ठार मारण्याची धमकी दिली होती. यानंतर तासाभरातच प्रियकराचा मृतदेह एका आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत आप्पा हा आपली आई सुमनसोबत भिवंडीतील अण्णाभाऊ साठेनगर परिसरात राहत होता. तो रंगारी कंत्राटदार होता. त्याचे काही महिन्यांपासून याच परिसरात राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, प्रेमसंबंधाची कुणकुण तरुणीच्या घरच्यांना लागल्याने त्यांनी विरोध केला. तरीही दोघे लपून-छपून भेटत असल्याची माहिती मुलीच्या भावांना मिळताच त्यांनी 8 जून रोजी सकाळी 6 वाजता आप्पाच्या घरी जाऊन त्याला मोठा वाडा परिसरात आणले. त्यावेळी त्यांनी त्याला बहिणीबरोबर असलेले प्रेमसबंध तोड, नाही तर तुला ठार मारून टाकेन, अशी धमकी दिली.
त्यामुळेच त्याच दिवशी सकाळी साडेसात वाजता नैराश्येतून आप्पाने साठेनगरच्या मागे मोठा वाडामधील एका आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा गुन्हा नारपोली पोलिसांनी दाखल केला आहे. तर आप्पाची आई सुमन (वय 45) यांनी मात्र आप्पाची त्या दोन भावांनी हत्या केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत लोंढे करत आहेत.