मीरा भाईंदर (ठाणे): मीरा भाईंदर शहरात सध्या अंमली पदार्थ विक्रीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.शहरातील अनेक भागात तरुण-तरुणी अंमली पदार्थांच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने अंमली पदार्थ बाबत जनजागृती देखील करणे गरजेचे आहे; मात्र पोलीस किरकोळ कारवाई करून मॅफेड्रॉन (एम.डी.) जप्त करत असल्याचे दिसून येत आहे. शहरात हे अंमली पदार्थ येतात कुठून यांच्या मुळाशी जाणे महत्त्वाचे आहे; परंतु पोलीस हे किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करून दिखावा करत असल्याची चर्चा सुरू आहे.
विक्रेत्यांवर पोलिसांचा छापा: काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीतील रेतीबंदर, घोडबंदर येथे एका चाळीमध्ये मोठ्या प्रमाणात मॅफेड्रॉन (एम.डी.) या अंमली पदार्थांची विक्री केली जात असल्याची माहिती जयंत बजबळे, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ १ मिरारोड यांना शनिवारी माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने त्यांनी त्या ठिकाणी पथकासह छापा टाकून कारवाई केली. त्यावेळी त्या ठिकाणी १०५ ग्रॅम वजनाचा ८ लाख ४० हजार रुपये किंमतीचा मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी साठा केला असल्याचे निष्पन्न झाले. मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याप्रकरणी आरोपी मरजहाँ ऊर्फ गुडीया ताजुद्दीन शेख आणि अली असगर हुसेन भाडेला, रा. रेतीबंदर, घोडबंदर यांच्याविरुद्ध काशिमीरा पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायदा १९८५ चे कलम ८ (क), २१(क), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पोलिसांचा कारवाईत सहभाग: ही कारवाई जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १, मिरारोड यांच्या अधिपत्याखाली स.पो.नि. दत्तूसाहेब लोंढे, स.फौ. अजय मांडोळे, पो.हवा. संतोष क्षीरसागर, विनोद चव्हाण, मिरारोड पोलीस ठाण्याचे स.पो.नि. योगेश पाटील, पो.हवा. बबन हरणे, म.पो. भाग्यश्री माने तसेच काशिमीरा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांनी केली आहे.
मुंबईतही कारवाई: अंमली पदार्थ तस्कारांविरुद्ध मुंबईतील अंमली पदार्थ विरोधी पथकाने कंबर कसली आहे. यात पार्श्वभूमीवर पथकाने गुरुवारी रात्री वरळी, घाटकोपर आणि वांद्रे भागात तीन ठिकाणी छापेमारी करून 195 ग्राम एम.डी. ड्रग्स जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 40 लाख रुपये आहे. प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. गणेश, देवेंद्र, इस्लाम खान, फहाद आणि मोहसीन अशी या आरोपींची नावे आहेत.