ठाणे - धावत्या लोकलमध्ये तरुणीवर विनयभंग करत तिला लोकलमधून खाली फेकण्याचा प्रयत्न झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ही घटना मध्य रेल्वेच्या आठगाव ते कसारा या रेल्वे स्थानकात ही घटना घडली. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. अमोल जाधव आणि अमन हिले अशी या आरोपींची नाव आहेत.
तिच्या एकटेपणाचा फायदा घेत, घडला प्रकार -
कसारा येथे राहणाऱ्या एक 21 वर्षीय तरुणी ठाण्यातील एका मॉलमध्ये मोठ्या पदावर कामाला आहे. ही तरुणी दररोज कसारा ते ठाणे दरम्यान लोकलने प्रवास करते. नेहमीप्रमाणे 25 नोव्हेंबरला ही तरुणी ठाण्याहून लोकल ट्रेनच्या महिला डब्ब्यात चढली. त्यावेळी लोकलमध्ये अनेक महिला होता. मात्र आठगाव स्थानकापर्यंत ही लोकल रिकामी झाली होती. त्यामुळे त्या लोकलच्या डब्ब्यात ही तरुणी एकटीच होती. यावेळी आठगाव स्थानकावरुन रेल्वे गाडी निघाल्यानंतर दोन तरुण धावत्या लोकलमध्ये चढले. दोघेही दारुच्या नशेत होते. या दोघांचे हावभाव पाहून तरुणी घाबरली होती. तिने लगचे तिच्या मोबाईलवर दोघांचे फोटो काढले. हे फोटो तिने तिच्या नातेवाईकांना तातडीने पाठविले.
तरुणीचा शेवटपर्यंत प्रतिकार -
या दरम्यान या दोघांनी धावत्या लोकलमध्ये पीडित तरुणीचा विनयभंग करण्यास सुरुवात केली. मात्र या तरुणीने शेवटपर्यंत त्यांचा प्रतिकार केला. या झटापटीत तिला चालत्या लोकलमधून फेकून देण्याचा प्रयत्न झाला. तोपर्यंत लोकल कसारा स्थानकात पोहोचली होती. त्यावेळी एक तरुण पसार झाला. तर दुसऱ्या आरोपीला तरुणीच्या नातेवाईकांनी पकडत पोलिसांच्या स्वाधीन केले. यानंतर पोलिसांनी पसार झालेल्या आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली. आरोपी अमोल जाधव आणि अमन हिले हे दोघे ठाण्याला एका कंपनीत कामाला आहेत. या दोन्ही आरोपींच्या विरोधात 307, 354 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.