ठाणे - कल्याण-डोंबिवली शहरातील रस्त्याने चालणाऱ्या पादचाऱ्यांचे धूम स्टाईलने दुचाकीवरून येत मोबाईल खेचून पसार होणाऱ्या अट्टल चोरट्यांची दुकली पकडण्यात कोळसेवाडी पोलिसांना यश आले आहे. फैजल कुरेशी (वय 24 वर्षे, रा. नवी गोविंदवाडी, कल्याण) आणि फय्याज अन्सारी (वय 22 वर्षे, रा. नदिनाका, भिवंडी), असे सराईत चोरट्यांची नावे आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून मोबाईल पळविणाऱ्या टोळीने कल्याण-डोंबिवली शहरात हैदोस घातला आहे. यावर आळा बसण्यासाठी पोलीस परिमंडळ 3 अंतर्गत धडक कारवाई मोहिमे सुरु केली आहेत. या मोहिमेंतर्गत सोमवारी चिंचपाडा रोड कल्याण पूर्वेत पोलिसांची गस्त सुरु असताना फैजल, फय्याज या दोन सराईत चोरट्यांना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असता झडती दरम्यान त्यांच्या मोटारसायकल मध्ये विविध कंपनीचे 1 लाख 10 हजार रू. किंमतीचे 12 मोबाईल फोन आढळले. तर त्यांच्या कडील 60 हजार रु. किंमतीची मोटारसायकलही चोरीची होती. चोरट्यांकडे सापडलेल्या मोबाईलबाबत कोळसेवाडी, मानपाडा, डोंबिवली, टिळकनगर, बाजारपेठ, खडकपाडा, महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात उघड झाले.
दरम्यान, ही कारवाई परिमंडळ ३ पोलीस उपायुक्तांच्या निर्देशानुसार कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराजे साळवे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भोगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ए. आर. भिसे, पोलीस हवालदार साळुंके, पोलीस नाईक बरकले, जाधव, बाविस्कर, रांताबे, कदम, पोलीस शिपाई नागरे, राजगे, परदेशी यांनी आरोपी फैजल कुरेशी, फय्याज अन्सारी यांच्या पथकाने केली आहे.
हेही वाचा - लग्नाचे आमिष दाखवून विवाहीत प्रियकराचा तरुणीवर अत्याचार