ठाणे - विषारी सापांशी जीवघेणे स्टंट करून त्याचे टिकटॉक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याने दोन तरुणांना चांगलेच महागात पडले. या व्हिडियोमधील एका अल्पवयीन मुलासह तरुणाला कल्याण वन विभागाने गजाआड केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे दोघे सापाला पकडून त्यांचे चुंबन घेण्याचे, लहान मुलांकरवी सापाचे चुंबन घेण्याचे फोटो, साप गळ्यात बांधून जीवघेणे स्टंट सोशल मिडियावर अपलोड करत होते. कुणाल लांडगे असे अटक तरुणाचे नाव असून मुख्य आरोपी जिगर भानुशाली असून तो अल्पवयीन आहे. दोघे आरोपी डोंबिवली पूर्वेकडील देसले पाडा, तुकाराम नगरमधील रहिवाशी आहेत.
काही दिवसांपूर्वी डोंबिवलीमध्ये राहणाऱ्या दोन तरुणाचे विविध सापासोबतचे फोटो व व्हिडियो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होते. या व्हिडियोमध्ये हे तरुण सापाचे चुंबन घेणे, लहान मुलांकरवी सापाचे चुंबन घेणे, चेहऱ्यापासून काही अंतरावर सापाला ठेवून सेल्फी काढणे, साप गळ्यात घालून फिरणे, जीवघेण्या पद्धतीने साप हाताळणे आशा नाना प्रकारे सापांशी जीवघेणे स्टंट करत असताना दोघे तरुण दिसत होते. याबाबत महाराष्ट्रसह गुजरातमधून अनेक प्राणी मित्रांनी वन विभागाला तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीनुसार वन विभागाने या व्हिडिओच्या आधारे सापांच्या जीवाशी खेळणाऱ्या व जीवघेणा खेळ करणाऱ्या या दोघा तरुणांचा शोध सुरू केला.
अखेर बुधवारी सकाळी या दोन्ही तरुणांना डोंबिवली येथून अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. यातील मुख्य आरोपी अल्पवयीन असून कुणाल लांडगे असे त्याच्या साथीदारचे नाव आहे. याबाबत वन विभागाच्या अधिकरी कल्पना वाघेरे यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला होता. हे दोघे स्वतःला सर्प मित्र म्हणून मिरवत होते. जीवघेण्या पद्धतीने साप हाताळणे, सापाचा मुका घेणे, असे जीवघेणे स्टंट करायचे. या पार्श्वभूमीवर या दोघांना शोध घेऊन सकाळी अटक केली. अशा प्रकारे सापांशी खेळू नये. तसेच आशा प्रकारचे लोक वावरत असतील तर वन विभागाला सहकार्य करावे, काही आक्षेपार्ह आढळल्यास वन विभागाच्या १९२६ क्रमांकावर संपर्क साधून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.