मीरा-भाईंदर (ठाणे) - शहरातील चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशीच एक घटना आमदार गीता जैन यांच्या कार्यालयासमोर असलेल्या एसके मेडिकलमध्ये घडली. गुरुवारी मध्यरात्री चार वाजण्याच्या सुमारास मेडिकलमध्ये एक व्यक्ती शटर तोडून आता येतो आणि रोख रक्कम घेऊन पळ काढतो. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
आमदार गीता जैन यांच्या कार्यालयासमोर एस.के मेडिकल असून या मेडिकलमध्ये २४ मे रोजी चोरी झाली होती आणि पुन्हा ९ तारखेला मध्यरात्री ४ च्या सुमारास चोरी झाली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एकाच दुकानात साडे तीन महिन्यात दोन वेळा चोरी झाली आणि तेही आमदार गीता जैन यांच्या कार्यालयासमोरच, यामुळे नेमके पोलीस काय करत आहेत, असा प्रश्न व्यापारी वर्ग विचारत आहे. साडेतीन महिन्यांपूर्वी ज्या वेळेस चोरी झाली होती, त्यावेळेसही तक्रार दाखल केली होती. परंतु, अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. आता पुन्हा त्याच दुकानात चोरी झाल्यामुळे व्यापारी वर्ग हैराण झाला आहे.
हेही वाचा - 'वर' शोधण्याच्या नादात तिने गमावले ७ लाख रुपये; भामट्यांवर गुन्हा दाखल
एस के मेडिकलचे मालक कल्पेश मालविया 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले की, या अगोदर २४ मे रोजी चोरी झाली होती. तेव्हा ७ हजार रोख रक्कम गायब झाली होती. तेव्हा नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. परंतु, पोलिसांनी लक्ष दिले नाही. "सध्या कोरोना आहे, आमचं डोकं खाऊ नका" असे पोलीस म्हणत होते. पुन्हा सकाळी चोरी झाली असून आता १० हजार पेक्षा जास्त आमचे नुकसान झाले आहे. पुन्हा आज तक्रार दाखल केली आहे, परंतु साडे तीन महिन्यात दोन वेळा चोरी झाल्यामुळे इथे सर्व व्यापारी वर्गामध्ये भीती निर्माण झाली आहे. या संदर्भात आम्ही आमदार गीता जैन यांना देखील पत्र दिले होते. परंतु, पोलिसांनी अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही.
या प्रकरणी आम्ही रितसर तक्रार दाखल केली आहे आणि आम्ही सर्व तपास करत आहोत, अशी माहिती नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली.