ठाणे - कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील मांडा-टिटवाळा पश्चिम परिसरातील पंचवटी चौक परिसरात तब्बल 20 जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली होती. नागरिकांनी रोष व्यक्त केल्यामुळे पालिका प्रशासनाने जागे होऊन भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम राबविण्यात आली.
हेही वाचा - भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिनी राहणार 350 सीसीटीव्हीची कॅमेऱ्याची नजर
टिटवाळ्यात मोकाट कुत्र्यांच्या वावर वाढला असून ये-जा करणाऱ्या नागरिक, विद्यार्थी, वृद्ध, महिला यांच्यात मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, या परिस्थितीवर कायमच्या उपाययोजना करण्यात कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन अकार्यक्षम ठरत असल्याचे वारंवार दिसून येत आहे.
तब्बल 20 जणांना या पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने घाबरलेल्या नागरिकांना रात्री बाहेर निघताना अक्षरश: काठ्या घेऊन बाहेर पडावे लागत होते. मांडा-टिटवाळा त्याचबरोबर बल्याणी, उभरणी यांसह वासुन्द्री रोड, गणेश मंदीर रोड आदी टिटवाळ्यातील परिसरात मोठ्या प्रमाणावर मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली होती. कुत्र्याच्या भेसूर आणि कर्कश आवाजाने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे. या मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेऊन लहान मुलांना जखमी केल्याच्या अनेक घटना या परिसरात घडलेल्या आहेत.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासन कुत्र्यांवर कुठलीही ठोस उपाययोजना करताना दिसत नाही. त्यातच या भागातील चिकन-मटण विक्रेते मटणाचे उर्वरित साहित्य हे कुठलीही योग्य विल्हेवाट न लावता रस्त्यालगतच घाण टाकत असल्याने या भागात कुत्र्यांचा वावर सातत्याने आढळत आहे.
'अ' क्षेत्र अधिकारी सुधीर मोकल यांना विचारले असता ते म्हणाले, परीसरात मोकाट कुत्र्यांचा वावर आहे, त्यानुसार या परीसरात तत्काळ श्वान पथक पाठवून उपाययोजना करण्यात येईल. त्यानुसार कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात आला. मात्र, पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्यात पथकाला अपयश आले आहे.
हेही वाचा - कांद्याचे भाव चढेच; सरकारकडून आयात सुरुच