ठाणे - मुंबई व आसपासच्या जिल्ह्यात अडकलेल्या मजुरांना नेण्यासाठी ठाण्यातून रेल्वेची व्यवस्था करण्यात आली होती. ही श्रमीक विशेष रेल्वे पाटण्याच्या दिशेने निघाली असून या रेल्वेने सुमारे बाराशे जण प्रवास करत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र टाळेबंदी करण्यात आली आहे. यामुळे रोजंदारी कामगारांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे अनेक परप्रांतीय कामगार जीव धोक्यात घालून विविध मार्गाने पायी जात आहेत. त्यामुळे शासनाकडून मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचविण्यासाठी श्रमिक विशेष रेल्वेची सोय करण्यात आली आहे.
या बाराशे जणांपैकी 1 हजार दहा जण मुंब्र्यातून तर 190 जण डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त बुरसे यांनी दिली. सामाजिक अंतर ठेवत सर्वांना विशेष बसमधून ठाणे रेल्वे स्थानकात आणण्यात आले होते. त्यानंतर त्यांना सुरक्षितरित्या रेल्वेमध्ये बसवून त्यांच्या गावी रवाना करण्यात आले आहे.
हेही वाचा - कल्याण-डोंबिवलीत २४ तासात आढळले कोरोनाचे २४ रुग्ण; बाधितांची संख्या पोहोचली ३०५ वर