नवी मुंबई - टीव्ही अभिनेता मनमीत ग्रेवाल याने नवी मुंबईतील खारघर येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. लॉकडाऊनमुळे उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद झाल्याने, तसेच डोक्यावर कर्ज असल्याने मनमीत ग्रेवाल तणावात होता. आर्थिक अडचण निर्माण झाल्याने मनमीत याने हे टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली.
मनमीत नवी मुंबईमधील खारघर येथील फ्लॅटमध्ये आपल्या पत्नीसोबत राहत होता. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्याने घरातच गळफास घेत आपले जीवन संपवले. मनमीतने सब टीव्ही चॅनेलवरील ‘आदत से मजबूर’ तसेच अॅण्ड चॅनेलच्या ‘कुलदीपक’ या मालिकेत काम केले होते. त्याने मालिकांव्यतिरिक्त काही जाहिरातींमध्येही काम केले होते.
आठ एपिसोड असणाऱ्या एका वेब सीरिजमध्येही तो अभिनय करत होता. यामधील तीन एपिसोडमध्ये तो दिसणार होता. याशिवाय अनेक अॅक्टींग स्कूलमध्ये तो शिकवण्यासाठी जात होता. पण लॉकडाऊनमुळे हे सगळंच बंद होऊन मनमीतच्या उत्पन्नाचे साधन बंद झाले. सोबतच डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा होता. हे कर्ज कसे फेडायचे या चिंतेत त्याने आत्महत्या केली असल्याचे त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितले.