नवी मुंबई - 'माता नव्हे तू वैरिणी', ही उक्ती नवी मुंबईत घडलेल्या घटनेला साजेशी ठरत आहे. पोटच्या मुलीच्या कौमार्याचा सौदा करणाऱ्या आईला नवी मुंबई पोलिसांनी गजाआड केले आहे. मुलीची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे.
मीरा-भाईंदर येथे राहणाऱ्या एका महिलेने तिच्या १८ वर्षांच्या मुलीच्या कौमार्याचा सौदा केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबधित महिलेच्या मुलीचे कोणत्याही पुरुषासोबत शारीरिक संबंध आले नव्हते. याचाच फायदा मुलीच्या आईने घ्यायचे ठरवले, आपल्या कौमार्य भंग न झालेल्या मुलीसाठी प्रथम संभोग करू इच्छिणारा ग्राहक शोधण्यास तिने सुरुवात केली. या घटनेची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन गरड यांना गुप्त सूत्रांच्या माध्यमातून मिळाली. त्यानुसार त्यांनी बनावट ग्राहकामार्फत संबंधित महिलेशी बोलणे केले असता, त्या महिलेने तिच्या कौमार्य भंग न झालेल्या मुलीशी प्रथम संभोग करण्यासाठी दीड लाखांची मागणी केली. त्यानंतर सव्वा लाखात सौदा करण्यात आला.
हेही वाचा - राज्य सरकारला मराठा आरक्षण नको आहे का, असा प्रश्न पडतो - विनोद पाटील
बनावट ग्राहकाने 31 ऑगस्टला नवी मुंबई नेरूळ येथील शिरवणे गावात त्या महिलेच्या सांगण्यावरून एक खोली बुक केली. संबधित महिला मुलीला घेऊन इंडिका कारने आली होती. बनावट ग्राहकांशी बोलणे करून त्याच्यासोबत मुलीला वेश्या व्यवसाय करण्याच्या उद्देशाने खोलीत पाठवण्यात आले असता काहीच वेळात बनावट ग्राहकाने पोलिसांना मोबाईलवरून ठरल्याप्रमाणे इशारा केला. पोलिसांच्या पथकाने पंचांसह त्या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत पीडित मुलीची आई पोलिसांच्या सापळ्यात सापडली. याप्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात कलम 370 भा.द.वि.सं., सह कलम 4,5 अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून मुलीची आई (वय 40) हिला अटक करण्यात आले असून पीडित मुलीस सुधारगृहामध्ये पाठविण्यात आले आहे.