ठाणे - भिवंडीत आठ किलो गांजासह तिघांना अटक करण्यात आली आहे. अब्दुल उर्फ बबलू इब्राहिम पिंजारी ( वय ३१ रा .अहमदनगर ) राहुल उर्फ सैराट आण्णा रहिले ( वय २७ रा. डोंबिवली पूर्व ) राजेंद्र आण्णा माळी ( वय २६ रा. डोंबिवली ) असे गांजा प्रकरणी अटक केलेल्या त्रिकुटाचे नावे आहेत. यांच्यावर कोनगाव पोलीस ठाण्यात तीन जणांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सापळा रचून तस्कर त्रिकूटाला अटक-
नाशिक येथून भिवंडीत विक्रीसाठी अवैध गांजा घेऊन येणार असल्याची खबर कोनगाव पोलीस आणि कल्याणच्या खडकपाडा पोलिसांना लागली होती. या माहितीच्या आधारे मंबई - नाशिक महामार्गावरील भिवंडी बायपास येथील बासुरी हॉटेलजवळ पोलिसांनी सापळा रचून तस्कर त्रिकूटाला अटक केली आहे. त्यांच्याकडून एक लाख साठ हजार रुपये किंमतीचा आठ किलो गांजा व तीन मोबाईल, असा एकूण एक लाख ७६ हजार किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डी एम शेणवी करीत आहेत.
परवा कल्याणमध्ये तर काल उल्हासनगरात गांजा तस्करावर झडप-
नवऱ्याचे निधन झाल्याने बायकोने तस्करीचा वारसा पुढे नेत नशेबाजीचा व्यापार सुरु केला. मात्र पोलिसांना सुगावा लागल्याने तिच्यासह तस्कर दुकलीला परवाच महात्मा फुले चौक पोलिसांनी गजाआड केले. उषाबाई रमेश पाटील, (वय, ४५ रा.पारोळा, जि. जळगांव) असे गांजा तस्करी प्रकरणी अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. तर रोशन पांडुरंग पाटील, अशोक इबु कंजर, (वय ४६), असे तिच्या अटक केलेल्या दुकली तस्करांची नावे आहे.
विशेष म्हणजे पोलिसांना काही दिवसांपूर्वी ११६ किलो गांजा या दोघांकडे मिळून आला होता, अशी माहिती गुन्हे निरिक्षक संभाजी जाधव यांनी दिली आहे. तर कालच अमली पदार्थ विरोधी पथकाने उल्हासनगरातील कॅम्प नं ५ येथील नेताजी चौकात दोन तरूणांवर झडप घालून त्यांच्याकडून ६ किलो ५०० ग्रॅम गांजा जप्त केला. हा गांजा सुमारे १ लाख ३० हजार ८०० रूपये किमतीचा आहे.
हेही वाचा- लसीकरणाला लवकरच सुरुवात, केंद्राने लस मोफत द्यावी- राजेश टोपे
हेही वाचा- महाराष्ट्र कोरोना अपडेट - राज्यात दिवसभरात ३ हजार ८८० कोरोनाचे रुग्ण, ६५ जणांचा मृत्यू