ठाणे - वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना बाल गणेशांनी रस्त्यावर उतरून चालकांना वाहतुकीची शिस्त लागावी, म्हणून गुलाबपुष्प देत जनजागृती केली. तर उल्हासनगर वाहतूक शाखेने चक्क तृतीयपंथीयांना वाहतूक पोलिसाचा गणवेश परिधान करून नियंत्रण शाखेच्या अधिकाऱ्यांसह दोन्ही शहरात लक्षवेधी जनजागृती करण्यात आली आहे.
सोमवारपासून सर्वत्र माघी गणपतीनिमित्त गणेश विराजमान झाले आहेत. त्यातच सध्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत कल्याण शहर वाहतूक शाखेतर्फे विविध माध्यमातून वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली जात आहे. माघी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कल्याणात वाहतूक नियमांबाबत जनजागृतीसाठी चक्क बालगणेश रस्त्यावर अवतरले. काही बालकांनी गणेशाचा वेष परिधान करून कल्याण स्टेशन परिसरात पथनाट्याच्या आधारे वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यात केली. या वेळी, या बाल गणेशांनी विनाहेल्मेट दुचाकीस्वारांसह विनामास्क रिक्षा चालक, तसेच बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांना गुलाब पुष्प देत वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस अधिकारी सुनीता राजपूत यांनी हा आगळावेगळा लक्षवेधी उपक्रम राबविला.
उल्हासनगरात तृतीयपंथीच बनले वाहतूक पोलीस
वाहतूक नियमांचे पालन व्हावे, यासाठी पोलीस दररोज नियमांचे धडे देत असतात. परंतु, उल्हासनगर शहरात वाहतूक पोलिसांच्या वर्दीत किन्नरांनी पोलिसांची भूमिका बजावली आहे. विनाहेल्मेट दुचाकी चालविणारे, सीटबेल्ट न लावता चारचाकी चालविणाऱ्या वाहनचालकांना थांबवून अशी चूक पुन्हा करू नका, ती तुमच्या जिवावर बेतेल, अशी विनंती वाहतूक पोलिसांच्या वेशातील किन्नरांनी केली. वाहन चालकांनी किन्नरांच्या विनंतीला मान देत अशी चूक पुन्हा करणार नाही, अशी शपथ घेतली. विशेष म्हणजे कल्याण मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. ह्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघातदेखील होत असतात. ह्या अपघातात मोठ्या प्रमाणात जिवीतहानी होत असते. वाहतुकीचे नियम आणि सुरक्षेच्या उपाययोजना यांचे पालन केले जात नसल्याची बाब उल्हासनगर वाहतूक पोलीस, हिराली फाउंडेशन, वान्या फाउंडेशन, एसएचएम महाविद्यालय व आरएसपी उल्हासनगर युनिटच्या लक्षात आली.
वाहनचालकांना थांबवून किन्नराची विनवणी
रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने वाहनचालकांचे लक्ष वेधण्यासाठी किन्नर महिलांना वाहतूक पोलिसांचा वेश परिधान करून एक पथनाट्याच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून वाहतूक पोलिसांच्या मदतीने किन्नरांनी विनाहेल्मेट दुचाकी चालविणारे, सीटबेल्ट न लावता चारचाकी चालविणाऱ्या वाहनचालकांना थांबवून विनवणी केलीय. अशी चूक पुन्हा करणार नाही, हेल्मेट घालून गाडी चालवू, अशी शपथ यावेळी मोटार सायकल चालकांनी घेतली. यावेळी उल्हासनगर वाहतूक विभाग प्रमुख श्रीकांत धरणे, हिराली फाउंडेशनच्या अध्यक्षा सरिता खानचंदानी, वान्या फाऊंडेशनच्या अध्यक्षा रेखा ठाकूर, नामांकित ऑडिओलॉजिस्ट डिंपल कुकरेजा, उल्हासनगर वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासह इतर नागरिक सहभागी झाले होते.