ठाणे - भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका प्रारशासनावर अंकुश ठेवण्यासाठी राज्य सरकारने महानगरपालिका आयुक्त म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी नियुक्त करावा, अशी जोरदार मागणी केली होती. त्याची राज्य सरकारने दखल घेऊन शनिवारी विद्यमान पालिका आयुक्त डॉ. प्रविण अष्टीकर यांची भिवंडी महानगरपालिका आयुक्त पदावरुन उचलबांगडी केली आहे. त्यांच्या जागेवर नाशिक उपजिल्हाधिकरी तथा कळवण येथील प्रकल्प अधिकारी डॉ. पंकज आसिया यांची नियुक्ती केली आहे.
आसिया हे २०१६ च्या भारतीय प्रशासकीय सेवेतील आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी शनिवारी सायंकाळी भिवंडी महानगरपालिका मुख्यालयातील दालनात येवून आपला पदभार स्विकारला आहे. महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कमालीचा वाढत असल्याने महानगरपालिका प्रशासन त्यास आळा घालण्यात अपयशी ठरत आहे. याबाबत पालिका प्रशासनाच्या विरोधात लोकप्रतिनिधी व नागरीकांमधून आरोप केले जात होते.
पालिका आयुक्त डॉ. प्रविण अष्टीकर यांच्या कार्यकाळात झालेले आर्थिक निर्णय वादग्रस्त ठरल्याबाबत, तसेच कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यात त्यांना अपयश आल्याने त्यांच्या बदलीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सपाचे आमदार रईस शेख़ , शिवसेना आमदार शांताराम मोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष भगवान टावरे आदींनी निवेदन दिले होते. राज्य शासनाने भिवंडी महानगरपालिकेवर आयुक्त म्हणून आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती केल्याने भिवंडीकर नागरीकांनी या नियुक्तीचे जोरदार स्वागत केले आहे.